Download App

सरकारने शब्द फिरवला, विरोधकांनी केला सभात्याग..

Budget Session : राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारण्याच्या घटनेची सरकारी पक्षाने दखल घेतली नाही. कारवाई करण्याचा शब्द देऊनही कारवाई केली नाही. मराठवाडा मुक्ती संग्रामाबाबत विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणीही सरकारने मान्य केली नाही. हा महाराष्ट्राचा अपमान आहे असा आरोप करत आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या सरकारला पाठीशी घालण्याच्या भूमिकेचा निषेध करत आज विरोधकांनी सभात्याग केला.

सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या. यानंतर विधिमंडळाच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली.

वाचा : ‘लव्ह जिहाद’वरुन Ajit Pawar यांनी सुनावले… धार्मिक द्वेष पसरवू नका!

अजित पवार म्हणाले, की राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारण्याच्या घटनेचा निषेध केला. अशा प्रकारची घटना कोणाच्याच बाबतीत घडू नये. हा प्रकार करणाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली. विधानसभेचे अध्यक्षांनी याबाबत आज निर्णय देतो असे सांगितले होते. पण त्यांनी तसे काही केले नाही. आम्ही फक्त त्यांच्यावरच नाही तर  आमच्या सदस्यांवरही कारवाई करण्याची मागणी केली होती. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

असे प्रकार करणाऱ्यांविरोधात कारवाई करून एक चांगला मेसेज सरकारने द्यावी अशी आमची भूमिका होती. त्यासाठीच आज आम्ही प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान हा मुद्दा उपस्थित केला होता. पण, त्यांच्याकडून काहीतरी सांगण्यात येत होते. ते आम्हाला मान्य नव्हते. या सदस्यांना निलंबित करण्याची मागणी आम्ही केली होती, असे पवार म्हणाले.

Ajit Pawar यांचा फडणवीसांवर हल्लाबोल.. विरोधकांना काय जेलमध्ये टाकता!

मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या मुद्द्यावरही आम्ही दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली होती. मात्र सरकारकडून फक्त एका ओळीचा ठराव देण्यात आला. हे अत्यंत चुकीचे आहे. हा खरेतर सगळ्या महाराष्ट्राचा अपमान आहे. त्यामुळे आम्ही सभागृहातून सभात्याग केल्याचे पवार यांनी सांगितले.

अध्यक्षांचा वेळकाढूपणा – थोरात 

राहुल गांधी यांच्याविरोधात जे आंदोलन केले तो प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. ही घटना अत्यंत निषेधार्ह आहे. जोडे आमच्याकडेही आहेत हे त्यांनी विसरता कामा नये. या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी आम्ही केली होती. आज कारवाई करू असे विधानसभ अध्यक्षांनी सांगितले होते. मात्र, त्यांनी तसे केले नाही. त्यांच्याकडून फक्त वेळकाढूपणा केला जात आहे. खरे तर यामध्ये अध्यक्षांचीच जबाबदारी जास्त आहे. पण त्यांच्याकडून टाळाटाळ केली जात आहे. या प्रकाराचा आम्ही निषेध करत असल्याचे काँग्रेस नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

 

Tags

follow us