Raj Thackeray : अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील बंडानंतर राज्याच्या राजकारणात अनेक अविश्वसनीय घडामोडी घडत आहेत. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली आहे. या भेटीचा अधिक तपशील समजू शकला नसला तरी ठाकरे-शिंदे भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज ठाकरे यांच्याबरोबर मनसे नेते बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे हे देखील उपस्थित होते.
#WATCH | Mumbai: Maharashtra Navnirman Sena Chief Raj Thackeray meets CM Eknath Shinde at his residence. pic.twitter.com/yQD6qnwzsf
— ANI (@ANI) July 7, 2023
राज ठाकरे काही महत्वाच्या मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करण्यासाठी येथे आल्याचे सांगण्यात येत आहे. बीडीडी चाळ, सिडको आणि नाशिक जिल्हा बँकेकडून होणारी कर्जवसुली यांसारख्या काही मुद्द्यांवर चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
राष्ट्रवादीचा काँग्रेसचा एक गट सरकारमध्ये सहभागी झाला आहे. या घटनेला आता चार ते पाच दिवस उलटले आहेत. यानंतरही राज्यात अनेक घडामोडी घडल्या आहेत. या अनपेक्षित घटनेने अनेक नव्या शक्यतांना जन्म दिला आहे.
शिंदेंच्या सेनेत जाताच गोऱ्हेंसाठी अंधारे झाल्या सटर-फटर….
महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि ठाकरे गटाचे टेन्शनही वाढले आहे. त्यांच्याकडून नवीन मित्रांची शोधाशोध केली जात आहे. कालही उद्धव ठाकरे आणि मनसे यांच्यात युती होईल तसा प्रस्ताव मनसेने ठाकरे गटाला दिल्याची चर्चा होती. मात्र, असा कोणताच प्रस्ताव ठाकरे गटाला दिलेला नाही असे खुद्द राज ठाकरे यांनाच जाहीर करावे लागले. खासदार संजय राऊत यांनीही आम्हाला असा काही प्रस्ताव मिळालेला नाही असे स्पष्ट केले होते. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांनी याआधीही भेट घेतली होती. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभुमीवर आता राज ठाकरेंनी शिंदे यांची भेट घेतल्याने तर्कवितर्क लावले जात आहेत.