Dhananjay Munde : पवार साहेब हेच आमचे दैवत, आमचे विठ्ठल आहेत. परंतु छगन भुजबळांनी सांगितलं त्याप्रमाणे आमच्या विठ्ठलाला तीन विशिष्ट बडव्यांनी घेरलं आहे. त्यामुळे विठ्ठल आणि भक्तांमध्ये दुरावा निर्माण होत गेला आणि त्याचा त्रास कार्यकर्त्यांना होत आहे. हे कुठंतरी थांबावं म्हणून आम्ही हे पाऊल उचललं. मात्र, शरद पवारांच्या अवतीभवती असलेले ते तीन बडवे कोण हे सांगणे मात्र त्यांनी टाळले.
दरम्यान, शरद पवार यांना घेरून असलेल्या ज्या बडव्यांचा उल्लेख अजित पवारांच्या गटातील नेते करत आहेत. त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्याकडेच रोख असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. या नेत्यांची नावे घेणे टाळले गेले असले तरी रोख त्यांच्याचकडे होता हे ही दिसून येत आहे. तिसरा बडवा कोण याबाबत मात्र संभ्रम कायम आहे. अजित पवार यांनीही त्यांच्या भाषणात ठाण्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे नाव न घेता घणाघाती टीका केली. त्यांच्यामुळेच पक्षातून अनेक दिग्गज नेते बाहेर पडल्याचे त्यांनी या सभेतच सांगितले.
मुंबईतील एमआईटी इन्स्टिट्यूट येथे आज अजित पवार गटाची बैठक झाली. या बैठकीत धनंजय मुंडे यांनीही रौद्ररुप धारण करत राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणावर जोरदार प्रहार केले. तसेच अजित पवार यांना या राजकारणाचा कसा त्रास झाला हेही सांगितले.या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, आ. छगन भुजबळ, रामराजे निंबाळकर, हसन मुश्रीफ, निलेश लंके, संग्राम जगताप, रुपाली चाकणकर, धर्मरावबाबा अत्राम आदी उपस्थित होते.
‘चिन्ह जाणार नाही, जाऊ देणार नाही’; शरद पवारांनी सांगितला हा प्लॅन
मुंडे म्हणाले, पवार साहेब हे माझे गुरू आणि दैवत आहेत, याआधी त्यांनी सत्तापटाचा जो कार्यक्रम करून दाखवला, तसाच कार्यक्रम आम्हीही केला. शेवटी मीही कच्च्या गुरूचा चेला नाही.
मी माझ्या कौटुंबिक वारशाचे राजकारण बाजूला ठेऊन पवार साहेबांच्या सान्निध्यात अजितदादांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलो. घरात फूट पडणे, पक्षात फूट पडणे, त्यातून होणाऱ्या मानसिक वेदना यातून मी स्वतः गेलो आहे. मला त्याची पूर्ण जाणीव आहे. मात्र आमच्यावर ही वेळ का आली, याचाही विचार केला गेला पाहिजे.
दोन्ही गटांचा राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा; ठोठावलं निवडणूक आयोगाचं दार
राजकारणातील गुगलीमुळे अजितदादांची बदनामी
अजितदादांना वेळोवेळी वेगवेगळ्या गोष्टींमध्ये अनेक वेळा अन्याय सहन करावा लागला. साहेबांनी टाकलेली तथाकथित ‘गुगली’ यशस्वी करण्यासाठी अनेकवेळा दादांना पुढे केले गेले, त्यातून त्यांना नाहक बदनामी सहन करावी लागली, हेही आता सहन करण्याच्या पलीकडे गेले आहे. आता दुपारच्या वेळी भाजपसोबत स्थापन झालेले सरकार, ही देखील एक गुगली नाही ना? असा मिश्किल सवालही धनंजय मुंडे यांनी केला.
आम्ही भाजपसोबत सत्तेत सामील झालो असलो तरी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणूनच सत्तेत सहभागी झालो आहोत. आपापल्या मतदारसंघात, जिल्ह्यात आणि राज्यातल्या जनतेला निवडणुकांमध्ये दिलेले शब्द पूर्ण करण्यासाठी, जनतेची कामे करण्यासाठी आम्ही या सत्तेत सहभागी झालोत, असंही धनंजय मुंडे यावेळी बोलताना म्हणाले.