प्रशांत गोडसे, मुंबई
Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात अंतर्गत खदखद चव्हाट्यावर आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी (Jayant Patil) तडकाफडकी आदेश काढत सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या आहेत. या निर्णयामागे पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातील पानिपत स्मारकाच्या मुद्द्यावरून झालेला वाद कारणीभूत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
१६ एप्रिल रोजी झालेल्या पक्षाच्या बैठकीत पानिपत येथे सरकारतर्फे प्रस्तावित शौर्य स्मारकाला समर्थन न देण्याची भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी मांडली होती. मात्र, मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी त्यांच्या भूमिकेला कडाडून विरोध करत स्मारकाला पाठिंबा जाहीर केला होता. तपासे यांचे आजोबा, माजी राज्यपाल गणपत तपासे यांनी यापूर्वीच पानिपत येथे शौर्य स्मारक उभारले आहे. त्यामुळे तपासे यांनी सरकारच्या स्मारकाला पाठिंबा देऊन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची नाराजी ओढवून घेतली होती. सूत्रांच्या माहितीनुसार महेश तपासे यांना मुख्य प्रवक्तेपदावरून हटवण्यासाठी सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा डाव खेळण्यात आला.
जयंत पाटील अन् अजित पवारांच्या भेटीवरून भुजबळांचा सवाल; म्हणाले, आम्ही शत्रू..काय बिघडलं?
हा वाद पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि मतभेदांचे द्योतक मानला जात आहे. शरद पवार गटाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत १० पैकी ८ जागा जिंकून दमदार कामगिरी केली असली तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पक्षातील ही खदखद चिंतेची बाब ठरू शकते. जयंत पाटील यांनी नियुक्त्या रद्द करताना कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. मात्र हा निर्णय पक्षाची एकजूट दाखवण्याच्या प्रयत्नांचा भाग असल्याचे काही नेत्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, तपासे यांच्या समर्थकांनी या कारवाईला ‘अन्यायकारक’ ठरवले आहे.
या घडामोडींमुळे महाविकास आघाडीतील पक्षांमध्येही चर्चा सुरू झाली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी अद्याप यावर भाष्य केलेले नाही, पण पक्षातील एकजुटीसाठी ते काय पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Sangli Politics : सांगलीत राष्ट्रवादीची ताकद वाढली, चार माजी आमदारांचा अजितदादांच्या पक्षात प्रवेश