Manoj Jarange Patil on Elections 2024 : आगामी निवडणुकीत सर्व जाती धर्मांचे, शेतकऱ्यांपासून डॉक्टरपर्यंत सर्व उमेदवार असतील. मी उमेदवार देईल त्याला समाजानं मतदान करावं. दगड असला तरी त्याला निवडून द्या. मी त्याच्याकडून काम करून घेईल अशा शब्दांत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत (Maharashtra Elections 2024) भाष्य केलं. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी काल उपोषण स्थगित केलं. उपोषण स्थगित करताना त्यांनी सरकारला 13 ऑगस्टचा अल्टिमेटम दिला. या मुदतीनंतर मात्र राज्यातील मराठा समाज पुन्हा रस्त्यावर (Maratha Reservation) दिसेल असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला होता.
मोठी बातमी : मनोज जरांगे पाटलांचे उपोषण अचानक स्थगित; पाचव्या दिवशी तब्येत ढासळली
लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Elections) राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. या निवडणुकीची तयारी सत्ताधारी आणि विरोधकांनी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर चालला. याचा महायुतीला जबर दणका बसला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून वेगळी रणनीती आखली जात आहे. त्यातच आता मनोज जरांगेंनी या निवडणुकीबाबत केलेल्या घोषणेमुळे राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.
जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा टीका केली. मागील चौदा वर्षात काही झालं नाही मग आताच कारवाई कशासाठी. मी गोरगरीबांसाठी लढतोय म्हणून, मी पुण्यात जाऊन जामीन घेऊन आलो पण आता नोटीस नाही सरळ वॉरंट काढलं जात आहे. कशासाठी हे घडवून आणलं जात आहे? असा सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.
फडणवीस साहेबांना हे शोभत नाही. उगाच आमचं आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका. सरकार आमचा विश्वास नाही असं मी म्हणणार नाही. त्यांनी आणखी दोन महिन्यांचा वेळ मागितला होता म्हणून आम्ही त्यांना 13 ऑगस्टपर्यंत वेळ दिला. यानंतर आता 19 ऑगस्ट रोजी मराठा समाजाची मोठी बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत पुढील दिशा ठरविण्यात येईल असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
मोठी बातमी : मनोज जरांगे यांच्याविरोधात अटक वॉरंट, नाट्य निर्माता फसवणूक प्रकरण
कोणतेही मंत्री आले नाहीत. त्यांना वाटते की कोणत्या तोंडाने जावे? कारण त्यांनी मराठा समाजाला दिलेले आश्वासन पूर्ण केलेले नाही. उपोषण करायला मी तयार आहे, पण असले बेगडी उपोषण नको. सलाईन लावून उपोषण होत नाही. हा फक्त वेळकाढूपणा झाला. आता समाजाचाही प्रचंड दबाव आहे. वेळ लागला तरी चालेल पण तुम्हीही आम्हाला हवे आहात, असे समाज म्हणत आहे. त्यामुळे उपोषण थांबवत आहे, असे स्पष्ट करत मनोज जरांगे पाटील यांनी काल बुधवारी उपोषण स्थगित केले होते.