Download App

‘पंकजा मुंडे अन् जानकरांच्या पराभवासाठी जरांगेंनी बैठका घेतल्या’; लक्ष्मण हाकेंचा दावा

लोकसभेत पंकजा मुंडे यांच्या पराभवासाठी मनोज जरांगेंनी बैठका घेतल्या. परभणीतून महादेव जानकरांना पाडण्यासाठीही प्रयत्न केले.

Jalna News : लोकसभेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या पराभवासाठी मनोज जरांगेंनी बैठका घेतल्या. परभणीतून महादेव जानकरांना पाडण्यासाठीही प्रयत्न केले. गेल्या 78 वर्षात या पुरोगामी महाराष्ट्रात धनगर समाजाचा एकही खासदार झाला नाही. महादेव जानकरांना पाडण्यासाठीही त्यांनी बैठका घेतल्या, अशा शब्दांत ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. हाके यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. आज हाके यांनी माध्यमांशी संवाद साधत जरांगेंवर जोरदार टीका केली.

मराठा समाजातील तरुणांच्या मनात जरांगेंनी संभ्रम निर्माण केला आहे. या निवडणुकीत शरद पवारांनी दहा पैकी आठ मराठा उमेदवार दिले होते. ते मॅनेजमेंट गुरू आहेत. राज्य सरकार मात्र अजूनही आमच्या उपोषणाची दखल घेत नाही. त्यांच्याकडून अधिकृत असं काहीच कळलेलं नाही अशी खंत लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केली.

ओबीसी आरक्षणाचे ताट वेगळेच हवे; हाकेंची भेट घेताच आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका

हाके पुढे म्हणाले, आरक्षण सामाजिक मागासांचं प्रतिनिधीत्व करतं. मराठा समाजातील तरुणांना माझी विनंती आहे की तुम्ही शासनाशी भांडून योजना घेतल्या पाहिजेत. मराठा समाज शेकडो वर्षांपासून राज्यकर्ताच आहे. राज्याचं नेतृत्व करणारा मराठा समाज आर्थिकदृष्ट्या गरीब असू शकतो. पण तरीही येथील व्यवस्था आणि प्रतिनिधी त्यांना समजावून सांगत नाहीत की हे मागासांचं आरक्षण आहे. वर्षानुवर्षे त्यांना प्रतिनिधीत्व मिळालेलं नाही त्यासाठी हे आहे.

ओबीसीतूनच मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या जरांगेंच्या मागणीलाही जनाधार मिळाला. लोकांनी पाठिंबा दिला असे विचारले असता हाके म्हणाले, जरांगे आता तुलना करत आहेत. आम्ही कधीच अशी तुलना केली नाही. आमचा आमदार नाही तुमचाच आमदार का? आमचा खासदार नाही तुमचाच खासदार का? असं आम्ही कधीच म्हणालो नाही. शासनाला माझी विनंती आहे की एकदा इम्पिरिकल डेटा गोळा करा आणि राज्याला वस्तुस्थिती कळू द्या.

लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे, महादेव जानकरांना पाडण्यासाठी मनोज जरांगेंनी बैठका घेतल्या. गेल्या 78 वर्षात या पुरोगामी महाराष्ट्रात धनगर समाजाचा एकही खासदार होऊ शकला नाही. धनगर समाजाची राज्यातली लोकसंख्या बघा. तरी देखील महादेव जानकरांना पाडण्यासाठी त्यांनी बैठका घेतल्या असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला.

हाकेंनी संयम ठेवलाय त्यांना गांभीर्याने घ्या; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहित पंकजा मुंडे मैदानात

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आज लक्ष्मण हाके (Lakshman Hake) यांची आंदोलनस्थळी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं जाऊ नये. ओबीसींच आरक्षणाचं ताट हे वेगळच असलं पाहिजे, अशी भूमिका स्पष्ट केली. तसेच लक्ष्मण हाके यांना उपोषण सोडण्यासाठी समजावून सांगितलं पाणी पिण्याचा आग्रह केला. मात्र हाके त्यांच्या आंदोलनावर कायम आहेत.

follow us