शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज रविवारी (14 जून) मुंबईतील ‘मातोश्री‘ निवासस्थानी दुपारी साडेबारा वाजता पक्षाच्या सर्व लोकसभा खासदारांची अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’च्या जोरदार चर्चा सुरू असताना, या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. आता या बैठकीला कोणते खासदार प्रत्यक्षात हजर राहिले, कोण ऑनलाईन जोडले गेले आणि कोण गैरहजर राहिले, याची सविस्तर माहिती समोर आली आहे.
बैठकीपुर्वीच उद्धव ठाकरेंना धक्का, शिर्डीचे खासदार वाकचौरे नॉटरिचेबल; ऑपरेशन टायगरची चर्चा
काही अपरिहार्य कारणांमुळे मुंबईत येऊ न शकलेल्या दोन खासदारांनी तंत्रज्ञानाचा वापर करत या बैठकीला डिजिटल पद्धतीने हजेरी लावली. संजय देशमुख पुढच्या महिन्यात मुलीचे लग्न असल्याने ते मुंबईला येऊ शकले नाहीत, त्यांनी ऑनलाईन हजेरी लावली. नागेश पाटील-आष्टीकर सध्या विधान परिषद निवडणुकीचा प्रचार सुरू असल्याने ते मतदारसंघात व्यस्त आहेत, त्यामुळे त्यांनीही ऑनलाईन हजेरी नोंदवली.
बैठकीला गैरहजर राहिलेले खासदार आणि त्यांची कारणं काय?
शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे नॉट रिचेबल असून बैठकीत सर्वाधिक त्यांची चर्चा रंगली आहे. वाकचौरे हे सकाळपासून ‘नॉट रिचेबल’ आहेत. ते गेल्या दोन दिवसांपासून आपल्या कुटुंबासमवेत बाहेरगावी गेले असून, त्यांचे स्वीय सहाय्यक देखील सोबत नाहीत. त्यांच्या या गूढ गैरहजेरीमुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर या बैठकीला ऑफलाइन किंवा ऑनलाईन अशा कोणत्याही पद्धतीने उपस्थित राहू शकलेले नाहीत. त्यांच्या मुलाची तब्येत बिघडल्याने त्याला पुण्यात रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे ओमराजे पुण्यात असून, त्यांनी याबाबतचा निरोप पक्षाचे नेते अनिल देसाई यांच्याकडं पाठवला आहे.
परभणीचे खासदार संजय जाधव हे देखील आजच्या बैठकीला अनुपस्थित राहिले आहेत. मतदारसंघात सुरू असलेल्या ‘धोंडे जेवणाच्या’ कौटुंबिक कार्यक्रमामुळं ते येऊ शकले नसल्याचं समोर आलं आहे. मात्र, सुरुवातीला त्यांच्याकडून पक्षाला कोणतंही स्पष्टीकरण न गेल्याने काही काळ चिंतेचे वातावरण होतं. दरम्यान, संजय दिना पाटील हे अद्याप ‘मातोश्री’वर पोहोचलेले नाहीत, मात्र त्यांनी आपण बैठकीला येत असल्याचे पक्षाला आधीच कळवले होतं.
ठाकरे गटाचे लोकसभेत एकूण 9 खासदार आहेत. त्यापैकी 7 खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या वावड्या उठल्यामुळे या बैठकीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले होते. जरी काही खासदार वैयक्तिक आणि कौटुंबिक कारणांमुळे गैरहजर असले, तरी ऐन बैठकीच्या वेळी शिर्डीचे खासदार वाकचौरे यांचे ‘नॉट रिचेबल’ असणे ठाकरे गटाची धाकधूक वाढवणारे ठरत आहे. आता या बैठकीत उद्धव ठाकरे उपस्थित खासदारांना काय कानमंत्र देतात? यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.
बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित असलेले खासदार
1. अरविंद सावंत (खासदार, दक्षिण मुंबई)
2. अनिल देसाई (खासदार, दक्षिण मध्य मुंबई)
3. राजाभाऊ वाजे (खासदार, नाशिक)
