मातोश्री परिसरात संतापाची लाट, उमेदवारी डावलेल्या इच्छुकांची जोरदार घोषणाबाजी
मुंबई महापालिका निवडणूक जाहीर झाल्यापासून इच्छुकांनी जोर लावला होता. अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तिकीट मिळाले नाही.
शिवसेना फुटीनंतर पक्षासाठी आयुष्यभर खस्ता खाल्ल्या. (Election) खांद्यावर झेंडे घेऊन पक्ष वाढवण्यासाठी पोटाची भूक भागविण्यासाठी वडापाव खाऊन अहोरात्र मेहनत घेतली. परंतु, ऐनवेळी निष्ठावंत राहिलेल्या पदाधिकाऱ्यांना ‘मातोश्री’ने डावलून उमेदवारीचे तिकीट दिले. इच्छुकांच्या समर्थकांनी त्यानंतर ‘मातोश्री’ येथे धाव घेऊन संताप व्यक्त केला. अनेकांनी ठिय्या मांडून जोरदार घोषणाबाजी केली. मातोश्री परिसरात त्यामुळे दिवसभर तणावाचे वातावरण पाहायला मिळाले .
मुंबई महापालिका निवडणूक जाहीर झाल्यापासून इच्छुकांनी जोर लावला होता. अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तिकीट मिळेल, या अपेक्षेने काम सुरू केले. निवडणूक आयोगाच्या सोडतीत अनेकांचे प्रभाग बदलले. तरीही जातीनिहाय प्रभागाचा आढावा घेऊन इच्छूक उमेदवारांनी कामाला गती दिली. प्रभागातील राजकीय समीकरणाचा अहवाल पक्षनेतृत्वाकडे सादर केला. तसेच इच्छुकांमध्ये कोणाला तिकीट दिले तर निवडणूक येईल, याबाबत माहिती देण्यात आली. परंतु, एबी फॉर्म देताना, अनेकांचे पत्ते कापण्यात आले. प्रभाग क्रमांक २०२ मध्ये सात टर्म नगरसेविका राहिलेल्या श्रध्दा जाधव यांना उमेदवारी दिली.
अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस! कुणी रडलं, कुणाची आत्मदहनाची धमकी तर कुणाची दगडफेक
या प्रभागासाठी श्रध्दा जाधव यांनी मुलगा आणि युवासेनेचा पदाधिकारी असलेल्या पवनसाठी आग्रह धरला. माजी नगरसेवक नंदू विचारे, शाखाप्रमुख विजय इंदुलकर, राजन आबिटकर हे येथे इच्छुक होते. मातोश्रीने मात्र त्यांना डावलून श्रध्दा जाधव यांना एबी फॉर्म दिला. संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी मातोश्रीवर निष्ठा मोर्चा काढून निषेध नोंदवला. जाधव सात टर्म नगरसेविका राहिल्या असल्या तरी प्रभागातील नागरिकांची सातत्याने फसवणूक केल्याचा आरोप करत त्यांना उमेदवारी देऊ नका, अशी आग्रही मागणी लावून धरली. पक्षनेतृत्व देखील जाधव यांच्या उमेदवारीवर ठाम राहिल्याने नंदू विचारे, विजय इंदुलकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरून मातोश्रीला आव्हान दिले.
वरळीतील १९३ मध्ये शिवसेनेच्या (ठाकरे) महिला नेत्या, उपमहापौर हेमांगी वरळीकर यांना मातोश्रीतून उमेदवारी जाहीर झाली. शाखाप्रमुख सूर्यकांत कोळी येथून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. परंतु, वरळीकर यांना उमेदवारी दिल्याने कोळी यांनी नाराजी व्यक्त केली. निष्ठावंत राहिलेल्या पदाधिकाऱ्यांना शिवसेना (ठाकरे) ‘मातोश्री’ने डावलले. इच्छुकांच्या समर्थकांनी त्यानंतर ‘मातोश्री’वर धाव घेत संताप व्यक्त केला.
धारावी येथील प्रभाग क्रमांक १८६ मधून दिवंगत माजी नगरसेवक राजेंद्र सूर्यवंशी यांची कन्या अंजली आणि भाऊ चेतन इच्छूक होते. मात्र, उमेदवारी न मिळाल्याने दोघांनी मातोश्रीसमोर वडिलांचा फोटो घेऊन आंदोलन केले. मानखूर्द येथे विठ्ठल लोकरे यांच्या पत्नीला उमेदवारी दिल्याने शाखाप्रमुख रोहिदास ढेरंगे यांनी शाखेतील पदाधिकाऱ्यांसह आंदोलन केले. परंतु, उद्धव ठाकरेंची भेट होऊ दिली नाही. त्यामुळे निष्ठा हारली का, असा सवाल शिवसैनिकांनी उपस्थित केला.
