मातोश्रीवरील बैठकीत तणावाचा स्फोट! उद्धव ठाकरे यांची खासदारांना थेट विचारणा, लढायचं नसेल तर स्पष्ट सांगा, मी थांबतो
बैठकीत केवळ संघटनात्मक चर्चा झाली नाही, तर पक्षातील नाराजी मतभेद आणि नेतृत्वाबाबतच्या अपेक्षा उघडपणे समोर आल्याचे सांगितले जात आहे.
Uddhav Thackeray’s direct question to MPs : शिवसेना (उबाठा) पक्षात अंतर्गत हालचालींना वेग आल्याची चर्चा असतानाच मातोश्रीवर झालेले खासदारांची बैठक आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे पक्षातील खासदारांना फोडण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे त्यांच्या गटाकडून सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर ही महत्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत केवळ संघटनात्मक चर्चा झाली नाही, तर पक्षातील नाराजी मतभेद आणि नेतृत्वाबाबतच्या अपेक्षा उघडपणे समोर आल्याचे सांगितले जात आहे.
बैठकीच्या सुरूवातीलाच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट आणि स्पष्ट शब्दांत खासदारांना उद्देशून भूमिका मांडली. तुमचे खासदार फुटणार आहेत, अशी माहिती मला राष्ट्रवादीकडून मिळते. मात्र, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. ही लढाई मी तुमच्या भरोशावर लढत आहे. जर लढायचं नसेल, तर ते स्पष्ट सांगा, मी थांबतो, अशा भावनिक मात्र ठाम शब्दांत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे बैठकीत काही काळ शांतता पसरल्याचे देखील समजते.
दरम्यान, राज्यसभेची शिवसेनेची पारंपरिक जागा शरद पवार यांना देण्याच्या निर्णयावरून वातावरण अधिकच तापलं आहे. खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी या मुद्द्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत, हा निर्णय पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय करणारा असल्याचे मत व्यक्त केले. त्यांनी विशेषतः संजय राऊत यांच्यावर नाराजी व्यक्त केली आणि संतप्त होत या बैठकीतून बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे बैठकीत काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
याचदरम्यान, इतर काही खासदारांनी देखील आपापल्या अडचणी आणि नाराजी मोकळेपणाने मांडल्या. जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांकडून देखील अपेक्षित पाठबळ मिळाले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर पक्ष संघटना कमकुवत होत असल्याचे देखील निदर्शनास आणून दिले.
नीरव मोदीला यूकेत मोठा धक्का; लंडन हायकोर्टाने पुनर्विचार याचिका फेटाळली, भारतात प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा
तसेच, उद्धव ठाकरे हे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईपुरते मर्यादित राहिल्यामुळे राज्यातील इतर भागांकडे पुरेसे लक्ष दिले गेले नाही, अशी टीका देखील बैठकीत झाली. पक्ष विस्तारासाठी राज्यभर दौरे आणि जनसंपर्क मोहिमा वाढवण्याची गरज असल्याचे खासदारांनी स्पष्ट केले. खासदारांनी विशेषतः आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रभर सक्रियपणे दौरे करावेत, कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधावा आणि पक्ष संघटना अधिक मजबूत करावी, अशी मागणी देखील केली. मात्र, या सूचनांमुळे आदित्य ठाकरे नाराज झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. पक्षातील काही नेत्यांना या टीकेची पद्धत देखील खटकली असल्याची चर्चा आहे.
बैठकीत आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे पक्षातील संवादाचा अभाव. अनेक खादारांनी नेतृत्वाशी थेट संवाद साधण्याच्या संधी कमी मिळत असल्याची तक्रार केली. निर्णय प्रक्रियेत सर्वांनी सहभागी करून घेण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काहींनी तर पक्षात कोअर टीम आणि ग्राउंड लेव्हल यांच्यात दरी वाढत असल्याचे देखील नमूद केले.
या सर्व घडामोडींमुळे शिवसेना (उबाठा) पक्षात अंतर्गत अस्वस्थता असल्याचे स्पष्ट होत आहे. एकीकडे बाहेरून एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून फोडाफोडीच्या हालचालींची चर्चा सुरू असताना, दुसरीकडे पक्षातील नाराजी आणि मतभेद उघडपणे समोर येत आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती पक्षासाठी आव्हानात्मक ठरू शकते. मात्र, या बैठकीनंतर पक्ष नेतृत्व कोणते ठोस निर्णय घेते आणि संघटनात्मक पातळीवर कोणते बदल घडवून आणते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.