ट्रान्सजेंडरसोबतचा कथित व्हिडिओ, मंत्री झिरवाळ वादाच्या भोवऱ्यात, काँग्रेसकडून राजीनाम्याची मागणी
अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याशी संबंधित एक आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
Minister Zirwal in the midst of controversy : राज्याच्या राजकीय वर्तुळात आज एक धक्कादायक आणि वादग्रस्त प्रकरण समोर आले असून, एका कथित व्हिडिओमुळे मोठी खळबळ उडाली आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याशी संबंधित एक आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा दावा करण्यात येत आहे. उपलब्ध माहितीनुसार, या व्हिडिओमध्ये झिरवाळ हे एका ट्रान्सजेंडर व्यक्तीसोबत दिसत असल्याचा आरोप आहे.
हा प्रकार मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून, त्यामुळे शासकीय सुविधांच्या वापराबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणात पवन यादव नावाच्या ट्रान्सवूमनचा उल्लेख केला जात असून, संबंधित व्हिडिओ तिचा भाऊ रवी यादव यांनी सार्वजनिक केल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, पवन यादववर याआधी मुंबईतील कुरार पोलिस ठाणे येथे दमदाटी व खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणात आणखी काही राजकीय व्यक्तींची नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची चिन्हे आहेत. या व्हिडिओनंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या असून, काँग्रेसने झिरवाळ यांच्या तात्काळ हकालपट्टीची मागणी केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तीव्र शब्दांत टीका करत, हा प्रकार महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिक अध:पतनाचे ज्वलंत उदाहरण असल्याचे म्हटले आहे.
अन्यथा भविष्यात मला काही गोष्टी सांगाव्या लागतील…, सुनिल तटकरेंचा रोहित पवारांना थेट इशारा
जनतेच्या विश्वासावर निवडून आलेल्या जबाबदार लोकप्रतिनिधीकडून अशा प्रकारचे वर्तन होणे संतापजनक आणि निषेधार्ह आहे. हे केवळ वैयक्तिक मर्यादांचे उल्लंघन नाही, तर सार्वजनिक जीवनातील नैतिकतेलाही धक्का देणारे आहे, असे सपकाळ यांनी नमूद केले. त्यांनी मुख्यमंत्र्यांनी कोणताही विलंब न लावता झिरवाळ यांना मंत्रीपदावरून दूर करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असला तरी त्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. संबंधित प्रकरणाबाबत झिरवाळ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तो होऊ शकला नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सत्यता आणि पुढील घडामोडींकडे राज्याचे लक्ष लागले आहे.