नवनीत राणा (Navneet Rana) आणि अनिल बोंडे (Anil Bonde). अमरावतीच्या राजकारणात भाजपचा (BJP) वरचष्मा तयार करणारे दोन चेहरे. गत विधानसभा निवडणुकीत बोंडेंचा तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांचा पराभव झाला. मात्र या दोन्ही पराभवांमधून सावरत या नेत्यांनी काँग्रेस-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बच्चू कडू (Bacchu Kadu) या नेत्यांसोबत संघर्ष केला, भाजपनेही (BJP) या दोघांना ताकद दिली. राणांना हिंदुत्वाचा प्रमुख चेहरा म्हणून पुढे आणले. बोंडे यांना राज्यसभेवर संधी दिली. आता याचे फळही भाजपला चाखायला मिळत आहे. बच्चू कडू, यशोमती ठाकूर, बबलू देशमुख अशा दिग्गजांचा पराभव करत या नेत्यांनी अमरावतीत भाजपचे पाच तर महायुतीचे सात आमदार निवडून आणले आहेत. यानंतर आता या नेत्यांनाही याचे फळ देण्याची तयारी भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात सुरु आहे.
राज्यातील फडणवीस सरकार आता स्थिरस्थावर झाले आहे. विधिमंडळात विश्वासदर्शक ठराव संमत झाला आहे. त्यानंतर आता मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठीच्या हालचाली अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत. अशात आता राज्यसभेतील अनिल बोंडे यांना राज्यात मंत्री म्हणून आणण्याच्या हालचाली सुरु आहेत. तर त्यांच्या जागेवर नवनीत राणा यांना पाठविण्यात येणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. नवनीत राणा यांचा मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघातून पराभव झाला. पण पराभवानंतरही संसदेत जाण्यासाठी राणा इच्छुक असून त्या यासाठी भाजप श्रेष्ठींच्या संपर्कात आहेत. त्यांची ही मागणी पूर्ण होण्याची लक्षणे दिसत आहेत.
तर अनिल बोंडे हे 2014 ते 2019 या काळातील फडणवीस सरकारच्या अखेरच्या टप्प्यात कृषिमंत्री होते. भाजपचे आक्रमक नेते म्हणूनही ते ओळखले जातात. अमरावतीत मिळविलेल्या विजयात बोंडे आणि राणा यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्याला बोंडेंच्या रूपाने मंत्रिमंडळात महत्त्वाचे स्थान देण्याचे भाजप श्रेष्ठींनी ठरविल्याचे कळते.
बोंडे हे 5 जुलै 2022 रोजी राज्यसभेवर निवडून गेले. त्यांच्या राज्यसभा सदस्यत्वाची मुदत 4 जुलै 2028 पर्यंत आहे. राज्याच्या विधानसभेत भाजप आणि महायुतीकडे प्रचंड बहुमत असल्याने बोंडेंच्या राजीनाम्यानंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीत राणा सहज निवडून येऊ शकतील. तर बोंडेंच्या रिक्त झालेल्या जागेवर त्या निवडून आल्यास त्यांना किमान साडेतीन वर्ष खासदारकी लाभेल. यामुळे अमरावती जिल्ह्यात लोकसभेवर असलेल्या काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनाही अस्वस्थ करणे व त्यांना सतत आव्हान देणे या खेळी नवनीत राणा करू शकतात. बोंडेंनी यापूर्वी मंत्रिमंडळात काम केले असून त्यांच्या अनुभवाचा लाभही भाजपला होणार आहे. याशिवाय राज्य विधान परिषदेत ६ जागा रिक्त झाल्या असल्याने बोंडेंना मंत्रिपदी नियुक्तीनंतर सहा महिन्यांत विधिमंडळाचा सदस्य करून घेणे भाजपसाठी सहज शक्यही होणार आहे.
दरम्यान, राणा यांना आणखी बळ मिळाल्यास अमरावती भाजपमधील एक गट नाराज होण्याची दाट शक्यता आहे. नवनीत राणा यांचा गट जिल्ह्यातील भाजपवर पकड मजबूत करण्यात यशस्वी ठरल्याचे चित्र आहे. मात्र यामुळे भाजपमधील एक गट अस्वस्थ झाल्याचे दिसू येत आहे. भाजपचे शहराध्यक्ष आणि माजी आमदार प्रवीण पोटे, प्रदेश सचिव जयंत डेहणकर, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अरविंद नळकांडे, शिवराय कुळकर्णी, किरण पातूरकर, चेतन पवार या स्थानिक नेत्यांचा राणाविरोधात गट सक्रिय आहे. लोकसभा निवडणुकीत या गटाने तटस्थ राहणे पसंत केले होते. विधानसभा निवडणुकीमध्येही राणा यांचे पती रवी राणा यांना बडनेरा मतदारसंघातून उमेदवारी देण्यास या गटाचा तीव्र विरोध होता. मात्र त्यांतरही भाजपने ही जागा रवी राण यांच्यासाठी सोडली, अमरावतीत भाजपचा प्रमुख चेहरा म्हणून ताकद दिली.
आता राणा यांना राज्यसभेवर पाठवत पुन्हा खासदार केल्यास राणा विरोधी भाजपमधील गट नाराज होण्याची शक्यता आहे. आता या पेचावर भाजपच्या वरिष्ठ वर्तुळातून कसा मार्ग काढला जातो हे बघणे महत्वाचे आहे.