राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक मनी लॉन्ड्रींग प्रकरणी अटकेत होते. वैद्यकीय कारणासाठी त्यांना न्यायालयाने दोन महिन्यांचा जामीन मंजूर केला आहे. नवाब मलिक बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादीच्या कोणत्या गटात जाणार? याची चर्चा सर्वत्र सुरु असतानाच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नवाब मलिकांची रुग्णालयात भेट घेण्यासाठी दाखल झाल्या आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका मांडली.
नवाब मलिक बाहेर आल्यानंतर कोणत्या गटात जाणार विचारताच सुप्रिया सुळे म्हणाल्या, मला माहित नाही पण मी पक्ष अन् राजकारणासाठी नाहीतर मोठ्या भावाला भेटण्यासाठी आले आहे. माझ्या भावाला न्याय मिळाला आहे, त्यामुळे मी इथे त्याला भेटायला आले असल्याचं सुळेंनी स्पष्ट केलं आहे. तसेच सत्य बाहेर येईलच, सत्यमेव जयते, असं म्हणत त्यांनी सूचक विधान केलं आहे. दरम्यान, नवाब मलिक यांच्या स्वागतासाठी अजित पवार यांच्या गटाचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे यांनी कार्यकर्त्यांनी बोलावल्याचं सांगितलं जात आहे. त्याचबरोबर नवाब मलिक यांची कन्या सना मलिक आणि कप्तान मलिक यांनी अलिकडेच अजित पवार यांची भेट घेतल्याची चर्चा आहे.
पृथ्वीराज चव्हाणांच्या गौप्यस्फोटानंतर बच्चू कडूंचाही शरद पवारांबाबत मोठा दावा
तसेच पुढे बोलताना सुळे म्हणाल्या, मी नवाबभाईंकडे पक्ष अन् राजकारण म्हणून आलेली नाही. माझा भाऊ आज रुग्णालयातून बाहेर येत आहे. त्यासाठी मी आले आहे. नवाब मलिकांवर खरंच अन्याय झाला असून कुटुंबियांसह राष्ट्रवादी पक्षाने त्यांच्यासाठी मोठा संघर्ष केला आहे. कुटुंबियांनीही खूप काही सहन केलं आहे, त्यामुळे शेवटी सत्य बाहेर येतंच, असं म्हणत सुळेंनी मलिक लवकरच न्यायालयाच्या कचाट्यातून बाहेर पडणार असल्याचे संकेत दिले आहेत.
NEET Exam : मुलावर अंत्यसंस्कार केल्यानंतर वडिलांनी संपवले जीवन; चेन्नईतील घटना
तसेच राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि नवाबभाईंवर अनेक केसेस दाखल झाल्या. या सर्व नेत्यांना अटकही करण्यात आली होती. मात्र, सर्वांना न्यायालयातून न्याय मिळाला आहे. सर्व नेते बाहेर आलेले आहेत. नवाबभाईंच्याही दोन महिन्यांच्या मुदतीत वाढ होणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं आहे.
नवाब मलिक यांना प्रकृतीच्या कारणास्तव दोन महिन्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. मनी लॉन्ड्रींग प्रकरणी ते अटकेत होते. राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते अशी नवाब मलिक यांची ओळख आहे. मलिक हे 23 फेब्रुवारी 2022 पासून तुरुंगात आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर ते सध्या कुर्ला येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.