New shocking revelations in the Ashok Kharat case : नाशिकमध्ये भोंदूबाबा अशोक खरात याच्याविरोधात गुन्ह्यांची मालिका वाढतच चालली आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला असून, आता एकूण गुन्ह्यांची संख्या 10 वर पोहोचली आहे. यामध्ये 8 गुन्हे थेट अशोक खरातविरोधात, तर गुन्हे त्याच्याशी संबंधित आहेत. या प्रकरणात पुण्यातील बांधकाम व्यवसायिक राजेंद्र जासूद यांनी तक्रार दाखल केली आहे. मृत्यूची भीती दाखवून आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला असून, त्याअंतर्गत खरातवर खंडणीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, लॉजिस्टिक व्यवसायासाठी अवतार पूजा करण्याचा बहाणा करून अशोक खरात याने जासूद यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळले. नागदेवतेला कोप होईल, दंश होऊन मृत्यू होईल अशी भीती दाखवत जासूद यांना सतत आर्थिक मागण्या केल्या. इतकचं नाही, तर अमेरिकेत वैद्यकीय उपचारासाठी जवळपास 29 लाख 81 हजार रुपये खर्च करण्यास भाग पाडले.
2018 पासून डिसेंबर 2025 पर्यंत वेळोवेळी फसवणूक करत सुमारे 4 ते 5 कोटी रुपयांची रक्कम उकळल्याचे तक्रारीत नमूद आहे. अवतार पूजेच्या नावाखाली महागडी मर्सिडीज कार देखील घेण्यात आली. तसेच ईशान्येश्वर मंदिराजवळ खोटा नाग दाखवून नागदेवतेची दर्शन घडवण्याचा बनाव करून भीती निर्माण करण्यात आली.
मातोश्रीवरील बैठकीत तणावाचा स्फोट! उद्धव ठाकरे यांची खासदारांना थेट विचारणा, लढायचं नसेल तर स्पष्ट सांगा, मी थांबतो
याशिवाय, मिरगाव येथील फार्महाऊस बांधण्यासाठी 1 कोटी 11 लाख रुपये, तुर्कस्थानचे फर्निचर बसवण्यासाठी 49 लाख रुपये, सागवानी फर्निचरसाठी 29 लाख आणि किचनसाठी 42 लाख 50 हजार रुपये उकळल्याचा आरोप आहे. अवतार पूजेच्या विधीच्या नावाखाली जासूद यांना युगांडा, इजिप्त, आयर्लंड, श्रीलंका, कंबोडिया, बांगलादेश तसेच म्यानमार आणि ग्रीनलँडसारख्या देशांत फिरवण्यात आले. ग्रीनलँडमध्ये स्वर्गाचं दुसरं टोक असल्याचं सांगत धार्मिक भीती निर्माण करण्याचा देखील प्रकार केल्याचे समोर आहे आहे.
दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जासूद यांनी पैसे परत मागितले असता, उलट अशोक खरात यानेच सिन्नरच्या वावी पोलीस ठाण्यात खोटा खंडणीचा गुन्हा दाखल केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली असून, अशोक खरातच्या कारवायांबाबत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
