Kiran Kale joins Thackeray group : ठाकरे गटाला (UBT) सध्या मोठी गळती लागली आहे. अनेक पदाधिकारी आणि नेते सोडून जात असल्यामुळे उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) धक्क्यावर धक्के बसत आहे. अशातच आता अहिल्यानगरमधील (Ahilyanagar) काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे (kiran Kale) यांनी आज रविवारी (दि. 23) उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला.
पुण्यातला राडा! मारणे टोळीच्या दहशतीचा नवा अंक; मुरलीधर अण्णांशी पंगा घेतलाय का?
आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेऊन पक्षांतराचे वारे जोरात वाहू लागले आहे. गेल्या महिन्यात अहिल्यानगरमधील ठाकरे गटातील १३ नगरसेवकांसह ४० पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. तर आता काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राहिलेले किरण काळेंनी ठाकरे गटात प्रवेश केला. १० फेब्रुवारी रोजी काळेंनी तत्कालीन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना पत्र लिहून शहर जिल्हाध्यक्ष पदाचा तसेच पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज ते शेकडो कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात सहभागी झाले. दुपारी मातोश्री येथे त्यांचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी काळे यांच्या हाती शिवबंधन बांधत मशाला दिली.
धंगेकर शिंदे गटात प्रवेश करणार का? सामंत म्हणाले, ‘एकनाथ शिंदेंशिवाय पर्यायच नाही…’
त्यांचा बुरखा आम्ही फाडणार…
ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर काळे म्हणाले, आम्ही अहिल्यानगरहून आलोय आणि अत्यंत खूश आहोत. बाळासाहेब ठाकरेंनी ज्या मातोश्रीवरून गर्जना केली, त्याच मातोश्रीवर ठाकरे गटात प्रवेश केलाय. सत्तेसाठी अनेक लोक पक्षातून बाहेर पडतायत. आम्ही कोणत्याही निवडणुकीला समोर नसताना संघर्षाचा मार्ग निवडण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही कोणावरच नाराज नाही, नाराजीतून हा प्रवेश नाही, असं ते म्हणाले. तसेच काही लोक बेगडी हिंदुत्वाची झूल पांघरून वावरत आहेत, पण, त्यांचा बुरखा आम्ही फाडणार आहोत, असंही काळे म्हणाले.
तर उद्धव ठाकरे म्हणाले की, किरण काळेंसारखे लढाऊ नेतृत्व आता शिवसेनेत आले आहे. त्यांचा प्रवेश म्हणजे प्रवाहाविरुद्ध येणे नव्हे तर चुकीच्या दिशेने चाललेला प्रवाह योग्य दिशेला नेण्याचं काम ते करत आहेत, असं म्हणत ठाकरेंनी काळेंचं शिवसेनेतं स्वागत केलं.
कोण आहेत किरण काळे?
किरण काळे यांचा राजकीय प्रवास राष्ट्रवादी काँग्रेसमधून सुरू झाला. काही काळानंतर त्यांचा आमदार संग्राम जगताप यांच्याशी वाद झाला आणि त्यामुळं त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती. यानंतर काळे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत सामील झाले. २०१९ च्या निवडणुकीत त्यांना अहिल्यानगरमधून तिकीट मिळाले, पण ते जिंकू शकले नाहीत. यानंतर काळे काँग्रेसमध्ये सामील झाले. चार वर्षांपूर्वी बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्यावर अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती.