पुण्यातला राडा! मारणे टोळीच्या दहशतीचा नवा अंक; मुरलीधर अण्णांशी पंगा घेतलाय का?

Pune Crime : 19 फेब्रुवारी दुपारची घटना. कोथरूड भागात दुचाकीवरून चाललेल्या तरुणाला चौघेजण बेदम मारहाण करतात. या मारहाणीत तरुणाच्या नाकाला गंभीर दुखापत होते. मारहाणीचं कारण काय तर फक्त गाडीचा धक्का लागला. म्हणून चौघाजणांकडून मारहाण होते. मारहाण झालेला व्यक्ती कोण तर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा निकटवर्तीय आणि मारहाण करणारे गजा मारणे टोळीतील गुंड. सुरुवातीला अगदी किरकोळ दिसत असलेला हा प्रकार खरंतर इतका मोठा निघाला.
सोशल मीडियाचं काम पाहणारा देवेंद्र जोग आणि गजा मारणे टोळीत खरंच काही वाद होता का? अगदी क्षुल्लक कारणावरून इतकी जबर मारहाण करण्याचं कारण तरी काय? मुरलीधर मोहोळ आणि गजा मारणे यांच्यातील कोणता जुना वाद पुन्हा उफाळून येतोय का? असे काही प्रश्न या घटनेनं उपस्थित केले. याच प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओतून घेऊ या..
गजा मारणे नेमका कोण, काय करतो ?
सर्वात आधी गजा मारणे नेमका कोण आणि राड्यामागचं कारण काय हे समजून घेऊ या.. पुण्यातील मुळशी तालुक्यातला गजा मारणे हा मारणे टोळीचा म्होरक्या म्हणून ओळखला जातो. जमीन मालक आणि बिल्डर लॉबी यांच्यातील मध्यस्थ म्हणून गजा मारणे काम करतो. या व्यवहारात स्वतःची टक्केवारी ठरवून घेतो. म्हणजेच जमीन मालक आणि बिल्डर यांच्यातील दलाल म्हणून हा गजा मारणे काम करतो.
काही वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणात गजा मारणेला अटक झाली होती. शिक्षा झाल्यानंतर गजा मारणे सलग तीन वर्षे येरवडा कारागृहात होता. नंतर तो बाहेर आला पण त्याचे आणि त्याच्या टोळीचे कारनामे काही थांबलेले नाहीत. मारणे टोळी आजही पुणे आणि आसपासच्या भागात दमदाटी करणे आणि जमीन बळकावण्याचे उद्योग राजरोस करत आहे. सरळ मार्गाने काम होत नसेल तर गुंडागर्दी आणि मारहाण ठरलेलीच अशी या टोळीची पद्धत आहे.
मारणे टोळीच्या दहशतीचा नवा अंक
पण आता याच मारणे टोळीच्या दहशतीचा नवा अंक पुण्यात सुरू झालाय. मारणे टोळीतील गुंडांनी थेट मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निकटवर्तीयावरच हल्ला केला. त्याचं झालं असं की 19 फेब्रुवारीच्या दुपारी देवेंद्र जोग त्याच्या दुचाकीवरून कोथरूडमधून निघाला होता. याच वेळी मारणे टोळीतील तिघे ते चौघे जण त्याच भागात होते. पुढे गाडीला धक्का लागल्याचं कारण झालं. पण देवेंद्र आपल्याकडे रागाने पाहतोय म्हणून मारणे टोळीतील या लोकांचा आणि देवेंद्रचा वाद झाला. हेच निमित्त ठरलं. या चौघांनी गाडीला धक्का लागला म्हणून देवेंद्रला बेदम मारहाण केली. त्याला रस्त्यावर पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली. यातल्याच एकाने त्याच्या नाकावर मारले. यामुळे देवेंद्रला मोठी दुखापत झाली. यानंतर टोळीने तेथून पळ काढला.
हा थरार घडल्यानंतर देवेंद्र जोग यांनी वडिलांना फोन करून बोलावून घेतलं. देवेंद्र यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढे मारहाण करणाऱ्या चौघांविरुद्ध कोथरुड पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ हालचाली केल्या आणि यातील तिघांना गजाआड केले. परंतु, यातील एक फरार झाला. हा फरार झालेला व्यक्ती गजा मारणेचा भाचा असल्याचे सांगितले जात आहे.
मुरलीधर मोहोळांची एन्ट्री
हा सगळा प्रकार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यापर्यंत पोहोचला. त्यांनी तत्काळ व्हिडिओ कॉल करत देवेंद्र यांची चौकशी केली. पण फक्त गाडीला धक्का लागला आणि मारहाण झाली इतकी ही घटना साधी आहे का? मनात शंका येतेच. गजा मारणे टोळीची जशी पुण्यात दहशत आहे तसेच मंत्री मुरलीधर मोहोळही पुण्यातील वजनदार राजकारणी म्हणून ओळखले जातात. तरीदेखील त्यांच्या निकटवर्तीयाला मारहाण होते म्हणजे प्रकरण वरकरणी दिसते तितके साधे नक्कीच नाही. गजा मारणे आणि त्याच्या टोळीची पुण्यात कितीही दहशत असली तरी ती मुरलीधर मोहोळ यांच्या तुलनेत नक्कीच कमी आहे.
गाडीचा धक्का अन् मारहाण प्रकरण सोपं नाहीच..
अशा प्रकारचे कृत्य करुन थेट मोहोळ यांनाच आव्हान देणं आपल्या अंगलट येऊ शकते याची जाणीव मारणे टोळीलाही आहे. तरी देखील फक्त रागाने पाहिलं आणि धक्का लागला म्हणून मुरलीधर मोहोळ यांच्या निकटवर्तीयाला मारहाण करण्याचा मूर्खपणा मारणे टोळीतील लोक करतील का? यामागे आणखी काही कारणं आहेत का? अशा प्रसंगातून गजा मारणेला आपली ताकद दाखवून द्यायची आहे का? किंवा एखाद्या जुन्या वादाची खुन्नस म्हणून देवेंद्रला मारहाण करण्यात आली का? या प्रश्नांची उत्तरे अजूनही गुलदस्त्यात आहेत.
दरम्यान, या घटनेच्या निमित्ताने पुणे शहरातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे. कायदा सुव्यवस्था दुरुस्त करून अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची दक्षता घेणे गरजेचे आहे.
पुण्यात गुंडाराज, गजा मारणेच्या टोळीनं पुन्हा तरूणाला बेदम मारलं; पोलीस अधिकारी काय म्हणतात?