Download App

नाशिकसाठी माझं नाव अचानक पुढं आलं, तिकीट मिळालं तर.. नाशिकच्या तिढ्यात भुजबळांची एन्ट्री!

Chhagan Bhujbal on Nashik Lok Sabha : महायुतीत नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा (Lok Sabha Election) निर्माण झाला आहे. या मतदारसंघात शिंदे गटाचा खासदार आहे. त्यामुळे या जागेवर शिंदे गटाने दावा ठोकला आहे. तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने या जागेसाठी जोर लावला आहे. त्यामुळेच राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांचं (Chhagan Bhujbal) नाव पुढे येऊ लागलं. भुजबळ या मतदारसंघातून निवडणूक लढणार का, अशी चर्चा सुरू असतनाच स्वतः छगन भुजबळ यांनीच मोठा गौप्यस्फोट केला आहे. मला माहिती नसताना नाशिक लोकसभेसाठी माझ्या नावाचा प्रस्ताव दिल्लीतून आला. जर तिकीट मिळालं तर लढायला तयार आहोत, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

नाशिकच्या जागेसाठी माझा आग्रह नव्हता. महायुतीची जी चर्चा दिल्ली मध्ये झाली त्यावेळी अचानक माझं नाव पुढे आलं. नाशिकला भुजबळांनी उभे राहावं हे दिल्लीतून ठरलं. यानंतर मी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील यावर चर्चा केली. फडणवीस यांनी सांगितलं की हे खरं आहे. अचानक नाव पुढे आल्यावर मी काही लोकांशी चर्चा केली. सध्याचे जे खासदार आहेत त्यांनी नाशिकसाठी आग्रह धरला आहे त्यामुळे सध्या फक्त चर्चा सुरू आहे. जो निर्णय येईल तो आम्हाला मान्य असेल अशा शब्दांत मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिले.

Chhagan Bhujbal : नाशिकमधून लोकसभा लढणार का? भुजबळांनी स्पष्टच सांगितलं

महायुतीसाठी आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत. सध्या विद्यमान खासदार हेमंत गोडसे उमेदवारीसाठी जास्त आग्रही आहेत. त्यामुळेच या जागेबाबत अजूनही चर्चा सुरू आहेत. याबाबतीत वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल तो मला मान्य असेल. महायुतीकडून नाशिकची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली तर पक्षाच्या घड्याळ या चिन्हावरच निवडणूक लढवणार असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, नाशिकच्या जागेवरून तिढा निर्माण झाला आहे. मनसे अद्याप महायुतीत आलेली नाही. परंतु त्यांच्याकडून नाशिकसाठी जोर लावला जात आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनेही या मतदारसंघाची मागणी केली आहे. अशात हा मतदारसंघ कुणाच्या वाट्याला जाणार यावर पुढील गणिते अवलंबून राहणार आहेत.

Lok Sabha Elections : तुतारी हाती घेताच निलेश लंकेचा हल्लाबोल, पण विखेंचे नो कमेंट्स 

 

follow us