Download App

पक्षांतराचा श्रीगोंदा पॅटर्न! कुणाच्या पारड्यात पडणार वजन, दिग्गजांच्या पक्षांतराने बदललं लढतीचं गणित

Ahmednagar Lok Sabha Election : निवडणुकीच्या काळात नेते अन् कार्यकर्त्यांची पक्षांतरं नेहमीचीच असतात. परंतु, हीच पक्षांतरं अनेकदा टर्निंग पाइंट ठरतात. नगर जिल्ह्याचा विचार केला तर दक्षिण मतदारसंघात फाईट टफ आहे. शरद पवार, अजित पवार आणि राधाकृष्ण विखे या नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. त्यासाठीच येथे फोडाफोडीच्या राजकारणाने वेग घेतला आहे. या राजकारणाचा केंद्रबिंदू श्रीगोंदा तालुका ठरला आहे. कारण मागील महिन्याभराच्या काळात येथे दिग्गज नेत्यांनी पक्ष बदलला आहे. त्यांच्या या पक्षांतराने पूर्ण मतदारसंघातील निवडणुकीची गणितं प्रभावित होण्याची शक्यता आहे. या तालुक्यात घडलेल्या तीन मोठ्या पक्षांतराच्या घटनांचा आढावा घेऊ या..

लोकसभा निवडणुकीच्या काळात पक्षांतराचे प्रमाण वाढले आहे. नगर जिल्हा सुद्धा त्याला अपवाद नाही. येथे तर यंदा टफ फाईट आहे. दक्षिण मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुजय विखे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यात लढत आहे. या निवडणुकीत स्वतः शरद पवार यांनी लक्ष घातले आहे. तर महायुतीचे राधाकृष्ण विखे पाटील आणि अजित पवार हे दिग्गज नेतेही लक्ष ठेवून आहेत. त्यातच या मतदारसंघात अशा काही घटना घडत आहेत ज्यामुळे राजकारणाची गणिते सातत्याने बदलत आहेत. राजकीय नेते मंडळींचे पक्षांतर जोरात सुरू झाले आहे ज्यामुळे दोन्ही बाजूच्या राजकारणात बेरीज आणि वजाबाकी सुरू झाली आहे.

श्रीगोंद्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीला आणखी बळ! दक्षिण जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब नाहाटा

नागवडे दाम्पत्याचा काँग्रेसला झटका

मागच्या महिन्याभराच्या काळात पक्षांतराच्या तीन मोठ्या घटना घडल्या. त्याही फक्त श्रीगोंदा तालुक्याशीच संबंधित आहेत. सर्वात आधी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे आणि त्यांच्या पत्नी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे यांनी काँग्रेसचा हात सोडत अजित पवार गटात प्रवेश केला. राजेंद्र नागवडे हे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे अत्यंत विश्वासू मानले जात होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ते असा काही निर्णय घेतील अशी शक्यता वाटत नव्हती. परंतु लोकसभेनंतरच्या विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी निर्णय घेतलाच. यामुळे काँग्रेससह संपूर्ण महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला.

अजितदादांना खंद्या समर्थकाची साथ

निवडणुका जवळ आलेल्या असताना झालेली ही वजाबाकी बेरजेत कशी बदलता येईल याचा विचार काँग्रेस नेत्यांच्या डोक्यात सुरू असतानाच अजिदादांच्या राष्ट्रवादीला आणखी गुडन्यूज मिळाली. अजित पवार यांचे खंदे समर्थक प्रवीणकुमार उर्फ बाळासाहेब नाहटा यांनी घरवापासी केली. अजितदादांनीही त्यांना थेट जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. मोठी जबाबदारी मिळाल्यानंतर नाहटा यांनीही मोठ्या जोमाने कामाला सुरुवात केली आहे. या राजकारणाचा फायदा सुजय विखेंना होणार आहे. दुसरीकडे निलेश लंकेंना थांबण्याचे सांगून सुद्धा त्यांनी शरद पवार गटात प्रवेश करून खासदारकीची उमेदवारी मिळवली याचा राग अजितदादांना आहे. यासाठीच त्यांनी जुन्या शिलेदारांना पुन्हा हाताशी धरत कोंडीचे डाव टाकण्यास सुरुवात केली आहे असेच म्हणावे लागेल.

घनश्याम शेलारांना सोबत घेत काँग्रेसची बेरीज

यानंतर मात्र काँग्रेसने बेरजेचं राजकारण केलं. काही दिवसांपूर्वी भारत राष्ट्र समितीत दाखल झालेले श्रीगोंदा तालुक्यातील मातब्बर नेते घनश्याम शेलार यांना पुन्हा काँग्रेस सोबत आणले. अर्थात शेलार यांच्या पक्षप्रवेशात बाळासाहेब थोरात यांची मोठी भूमिका होती हे नाकारता येणार नाही. कारण शेलार यांच्या पक्ष प्रवेशानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात थोरात यांनी श्रीगोंद्यात काही जण आम्हाला सोडून गेले पण ती जखम आम्ही भरून काढू असे जाहीर वक्तव्य केले होते. अर्थात त्यांचा रोख नागवडे दाम्पत्यावरच होता हे लपून राहिलेले नाही.

Ahmednagar Lok Sabha : महिलांना उमेदवारी देण्यात राजकीय पक्षांची पाठ; नगर-शिर्डीत पाटी कोरी

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घनश्याम शेलार यांच्यासारखा अनुभवी आणि राजकीय दृष्ट्या बळकट नेता काँग्रेसला मिळाला आहे. निवडणुकीत मातब्बर नेत्यांना जेरीस आणण्याची क्षमता शेलार यांच्यात नक्कीच आहे. शेलार चांगले वक्तेही आहेत. आपल्या भाषणांतून विरोधी पक्षांवर तिखट शब्दांत हल्ला चढविण्यात ते माहीर आहेत. त्यांच्या राजकीय कौशल्याचा फायदा महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना होईल अशी शक्यता व्यक्त होत आहे.

यानंतर आता श्रीगोंदा तालुक्यातील आणखी एक नेते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस लवकरच शरद पवार गटात प्रवेश करतील अशी शक्यता आहे. या पक्ष प्रवेशाला स्वतः भोस यांनीच दुजोरा दिला आहे. भोस यांनी चार ते पाच दिवसांपूर्वी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली होती. जर बाबासाहेब भोस यांनी खरच तुतारी हाती घेतली तर राजेंद्र नागवडे यांच्यासाठी हा मोठा धक्का ठरू शकतो.

follow us

वेब स्टोरीज