Ahmednagar Lok Sabha : महिलांना उमेदवारी देण्यात राजकीय पक्षांची पाठ; नगर-शिर्डीत पाटी कोरी

Ahmednagar Lok Sabha : महिलांना उमेदवारी देण्यात राजकीय पक्षांची पाठ; नगर-शिर्डीत पाटी कोरी

प्रवीण सुरवसे, (प्रतिनिधी)

Ahmednagar Lok Sabha Election : देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून राजकीय पक्षांकडून आपापल्या उमेदवारांची घोषणा देखील केली जात आहे. यातच नगर जिल्ह्यातील शिर्डी मतदारसंघ व नगर दक्षिण मतदारसंघातून उमेदवारांची नावे घोषित झाली आहेत. मात्र या सगळ्यांमध्ये विचार केला असता एकाही महिला उमेदवाराला कोणत्याही राजकीय पक्षाकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही.

देशभरात महिला पुरुष समानतेचा नारा दिला जात असला तरी निवडणुकांमध्ये डावलला जात असल्याचे देखील समोर येते. एकंदरीतच नेत्यांना महिलांचे मतदान हवे मात्र त्यांना उमेदवारी नको असेच काहीसे चित्र नगर जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. अहमदनगर जिल्ह्याने आजपर्यंत एकही महिलेला लोकसभेत पाठवले नाही हेच या माध्यमातून स्पष्ट होत आहे.

नगर जिल्ह्यात शिर्डी लोकसभा मतदारसंघ व नगर दक्षिण असे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. यंदाच्या वर्षी म्हणजे 2024 साठी नगर दक्षिणेतून महायुतीकडून सुजय विखे व महाविकास आघाडीने निलेश लंके यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे शिर्डी मतदारसंघातून मविआने भाऊसाहेब वाकचौरे तर महायुतीने सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी दिली आहे. दोन्ही मतदारसंघांमध्ये एकाही महिला उमेदवाराला संधी देण्यात आली नाही.

ठाकरेंच्या तिरक्या चालीने भाजप अस्वस्थ; जळगावात थेट उमेदवारच बदलणार?

68 वर्षात एकाही महिलेला संधी नाही

नगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा प्रामुख्याने विचार केला असता गेल्या 68 वर्षांमध्ये एकाही पक्षाने आजवर महिलेला लोकसभेची उमेदवारी दिली नाही. 1951 ते 2019 या दरम्यान 14 लोकसभेच्या निवडणुकांमध्ये एकही महिला उमेदवार लोकसभेच्या निवडणुकीत नव्हती. विशेष म्हणजे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने आजवर एकाही महिलेला उमेदवारीची संधी दिली नाही. भाजप, शिवसेना, काँग्रेस, रिपाई तसेच अपक्ष यांनी या ठिकाणावरून आजवर निवडणूक लढवली. मात्र महिला उमेदवार या लोकसभेच्या निवडणुकीपासून दूर होत्या.

नगर दक्षिणेतून या 3 महिलांना संधी 

मात्र या घटनेला नगर दक्षिण हा अपवाद राहिला आहे. नगर दक्षिणेमधून आत्तापर्यंत तीन महिलांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली होती. यामध्ये 2009 मध्ये नौशाद अन्सार शेख यांनी पहिल्यांदा लोकसभेचे रणशिंग फुंकले. अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या नौशाद शेख यांना साडेतीन हजारहून अधिक मते मिळाली होती.

नकली शिवसेना, राष्ट्रवादी महाराष्ट्राचे भले करतील का? अमित शाहांचा ठाकरे, पवारांवर हल्लाबोल

2014 मध्ये आम आदमी पक्षाने उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरवले होते. नगर दक्षिण मतदारसंघातून अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी उमेदवारी केली होती. सय्यद यांना देखील या निवडणुकीमध्ये सात हजाराहून अधिक मते मिळाली होती. तर 2019 च्या निवडणुकीमध्ये कोमल सावंत यांनी वयाच्या 61 व्या वर्षी अपक्ष उमेदवारी जाहीर करत लोकसभेच्या रिंगणात उतरल्या होत्या. मात्र सावंत यांना केवळ हजार ते बाराशे मते मिळाली होती.

महिला पुरुष मतदारांची आकडेवारी

नगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघ व नगर दक्षिण या दोन्हीही मतदार संघातील महिला मतदारांची व पुरुष मतदारांची आकडेवारी लक्षात घेतली असता फार मोठा असा फरक नाही. 2024 च्या लोकसभेसाठी पुरुष मतदारांची आकडेवारी पाहिले असता पुरुषांची संख्या ही 18 लाख 73 हजार 769 आहे तर महिलांची 17 लाख 37 हजार 67 एवढी आहे. एकंदरीतच पुरुषांच्या बरोबरीने आज महिलांची संख्या आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube