Download App

‘पंधरा वर्षांनंतरही संधी नाही, मग किती काळ गप्प राहायचं?’ रुपवतेंनी व्यक्त केली खंत

मी काँग्रेस पक्षात 15 वर्ष थांबले तरीही मला संधी मिळाली नाही. मग आपण नेहमी गप्प बसायचं का ? असा सवाल शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उत्कर्षा रुपवतेंनी उपस्थित केला.

Shirdi Lok Sabha Election 2024 : शिर्डी लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार (Shirdi Lok Sabha Election 2024) उत्कर्षा रूपवतेंनी अकोले शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन केले आहे. चौथ्या टप्यात असलेल्या शिर्डी लोकसभा निवडणुकीचा प्रचार शनिवारी (11 मे) पाच वाजता संपल. त्याआधी उमेदवारांनी आपापल्यापरीने जोरदार शक्तीप्रदर्शन करत प्रचाराची सांगता केली. उत्कर्षा रूपवतेंनी अकोले शहरात जोरदार शक्तीप्रदर्शन करत प्रचाराची सांगता केली. यावेळेस त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले दोन्ही उमेदवारांवर सडकून टीका केली.

यावेळी त्यांनी अकोले तालुक्याचे शिल्पकार दादासाहेब रुपवते असल्याची आठवण करून दिली. निळवंडे धरणाची जमिन निश्चिती दादासाहेब रुपवते यांच्या मंत्रिपदाच्या काळात झाली. याचे कारण म्हणजे त्यांनी कमीत कमी गावे धरणाखाली येतील अशी जमीन निश्चित केली. दुसरे म्हणजे अगस्ती साखर कारखाना दादासाहेब रुपवते यांनी उभा केला. पण दादासाहेबांनी कधीही या गोष्टींचे श्रेय घेतले नाही.

आजी-माजींच्या काळात शिर्डीचा विकास थांबला; उत्कर्षा रुपवतेंचा हल्लाबोल

बहुजन शिक्षण संस्थेची सुरुवात ही अकोलेपासूनच झाली. ही संस्था आज नगर जिल्ह्यात कार्यरत असून बहुजन समाजातील मुलं यामध्ये शिक्षण घेऊन आज मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. यावेळी त्यांनी भावूक होत त्यांचे वडील दिवंगत प्रेमानंद रुपवते यांच्या आठवणींना उजाळा दिला. उत्कर्षा म्हणाल्या माझे वडील म्हणाले होते की आपण दिल्लीत जाऊन राहुल गांधी यांची भेट घेऊ आणि आपली भूमिका समजावून सांगू, ते नक्कीच तिकीट देतील. असे स्पष्ट करत वडिलांचं नाव लोकसभेत न्यायचं आहे असे उत्कर्षा रुपवतेंनी सांगितले.

उत्कर्षा रुपवतेंनी आपल्या राजकीय भूमिकेवर पहिल्यांदाच भाष्य केले. मी काँग्रेस पक्षात 15 वर्ष थांबले तरीही मला संधी मिळाली नाही. मग आपण नेहमी गप्प बसायचं का? असा सवाल उपस्थित केला. यानंतर त्यांनी विरोधकांवरही जोरदार हल्लाबोल केला. सदाशिव लोखंडे आणि भाऊसाहेब वाकचौरे दुसऱ्यांची यंत्रणा घेऊन लढत आहेत आणि आम्हाला बी टीम म्हणतात. आम्ही कुणाला पाडायला नाही तर जिंकायला ही निवडणूक लढत आहोत. माझ्याकडे व्हिजन आहे आणि मी जाहीरनामा घेऊन लढतेय. सर्व घटकांसाठी काम करणार आहे, असे उत्कर्षा रुपवते म्हणाल्या.

शिर्डी लोकसभेची लढाई धनशक्ती विरुध्द जनशक्ती; उत्कर्षा रूपवतेंचा आजी-माजींवर हल्लाबोल

follow us