Municipal Council Shrigonda Election : अहिल्यानगर जिल्ह्यात एक नगरपंचायत आणि अकरा नगरपालिकेसाठी चुरशीच्या लढती होतायत. यात सर्वाधिक लक्ष लागलेली नगरपालिका आहे ती श्रीगोंद्याची. (Municipal Council Shrigonda Election) कारण येथे महायुती फुटलीय. नगराध्यक्ष व नगरसेवकासाठी चौरंगी लढत होतेय. विधानसभेप्रमाणे नगरपालिकेचे राजकारण घड्याळाच्या काटाप्रमाणेच फिरतंय. सर्वाधिक नेते असलेले या तालुक्यात कोणत्याच पक्षात मेळ राहिलेला नाही. त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला श्रीगोंद्यात पाय ठेवायला जागा नव्हती. तेथे त्यांना चक्क नगराध्यक्षपदासाठी तगडा उमेदवार हाताला लागलाय. त्यामुळे येथील निवडणूक चुरशीचा होईल. पण आमदार विक्रम पाचपुते, (Vikram Pachpute) राजेंद्र नागवडे (Rajendra Nagwade) यांचे काय होणार हेच व्हिडिओतून पाहुया…
महायुतीमध्ये श्रीगोंद्यात मोठी फूट पडलीय. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत. पण महाविकास आघाडी भक्कम एकत्र राहिलीय. सर्व पाचपुते विरोधक एकत्र येतील, एकास एक लढत होईल, असे बोलले जात होते. परंतु ते काही शक्य झालं नाही. त्यामुळे श्रीगोंद्यात चौरंगी ‘टफ फाइट’ दिसतेय. सुनीता खेतमाळीस याच भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. त्यांचे पतीही माजी नगराध्यक्ष राहिलेले आहेत. शिंदेंच्या शिवसेनेकडून माजी नगराध्यक्षा शुभांगी मनोहर पोटे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्योती सुधीर खेडकर उमेदवार आहेत. (Municipal Council Shrigonda Election Rajendra Nagwade Vikram Pachpute)
राजन पाटलांचं नाव अमेरिकेपर्यंत गेले; जयकुमार गोरेंकडून कौतुक अन् राष्ट्रवादी काँग्रेसला टोला
महाविकास आघाडी भक्कम
महायुती फुटली असली तरी श्रीगोंद्यात महाविकास आघाडी भक्कम असल्याचे चित्र आहे. शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते बाबासाहेब भोस आणि काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले यांनी एकत्रित येत महाविकास आघाडीचा पॅनल तयार केलाय. गौरी गणेश भोस या महाविकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. त्या ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यांच्या सून आहेत. भोस हे नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष आहेत. तरीही त्यांनी राजेंद्र नागवडे यांचा विचार न करता महाविकास आघाडीची वज्रमूठ बांधलीय.
ओबीसी, मराठा जातीय फॅक्टर ठरणार महत्त्वाचा
श्रीगोंद्यातील जातीय फॅक्टरही महत्त्वाचा ठरणार आहे. नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी आहे. परंतु चारही पक्षांनी महिला उमेदवार मैदानात उतरविल्या आहेत. त्यातही चारही लढती ओबीसी व मराठा उमेदवारामध्ये आहेत. भाजपच्या सुनीता खेतमाळीस या माळी समाजाच्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती खेडकर याही माळी समाजाच्या आहेत. तर भोस आणि पोटे या मराठा समाजातील आहेत.
पाचपुते, नागवडेंची कसोटी
या नगरपालिकेत भाजपचे आमदार विक्रम पाचपुते, अजित पवार गटाचे राजेंद्र नागवडे यांची कसोटी लागणार आहे. राष्ट्रवादीत राजेंद्र नागवडे, बाळासाहेब नाहाटा, माजी आमदार राहुल जगताप यांच्यासारखे नेते आहेत. त्यामुळे ही जागा महायुतीतील भाजप, राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची आहे. तर शिंदे गटानेही येथे तगडा उमेदवार दिलाय. त्यामुळे श्रीगोंद्यात राजकीय घमासान दिसणार आहे. या चौरंगी लढतीत मतदार कुणाच्या बाजूला आहेत. ते मतमोजणीला समोर येईल.
