राजेंद्र नागवडेंनी राहुल जगताप, शेलारांवर डागली तोफ !

राजेंद्र नागवडेंनी राहुल जगताप, शेलारांवर डागली तोफ !

अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्याच्या राजकीय जडणघडणीत मागील १५ वर्षात नागवडे कुटुंबीयांनी (Nagwade family) तालुक्यातील नेत्यांना मदत करण्याचे काम केले. मात्र उपकाराची जाण मदत करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना राहिली नाही. त्यामुळं त्यांना त्यांना मदत केली ही घोडचूक झाल्याची खंत व्यक्त करत काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष राजेंद्र नागवडे (Rajendra Nagwade) यांनी श्रीगोंदा येथे पत्रकार परिषद घेत तालुक्यातील नेत्यांवर आगपाखड केली.

श्रीगोंदा येथे काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलतांनी नागवडे यांनी सांगितलं की, मागील दहा पंधरा वर्षातील राजकारणात जगताप कुटुंबाला नागवडे कुटुंबीयांनी राजकीय त्याग करत मोलाची मदत केली. कुकडी कारखान्याची निवडणुक बिनविरोध होण्यासाठी नागवडे कुटुंबाचे मोठे योगदान असल्याचे सांगत राहुल जगताप यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी पोरकटपणा सोडावा असे आवाहन केले.

Rajan Patil यांनी यंदाही आपला गड राखला; मोहोळ बाजार समिती बिनविरोध 

जगताप यांच्या बरोबरच तालुक्यातील आण्णासाहेब शेलार यांना जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि कारखाना निवडणुकीत मदत करत समाजकारणासह राजकारणात पुढे आणण्यासाठी मोलाचा वाटा आहे. तर बाळासाहेब नाहटा यांना देखील पंचायत समिती निवडणुकीत मदत केली. राजकारण करत असताना नागवडे कुटुंबांनी पाठीत खंजीर खुपसण्याचे काम कधी केले नाही. नुकत्याच झालेल्या खरेदी विक्री संघाची निवडणुक करताना उमेदवारीचे निर्णय घेताना मनात कोणतीही शंका ठेवली नाही. मात्र या निवडणुकीत नागवडे-पाचपुते यांचे उमेदवार कसे पडतील याकडे त्यांनी जास्त लक्ष दिल्याचा आरोप नागवडेंनी केला.

ते म्हणाले की, वैयक्तिक स्वार्थासाठी तालुक्यातील नेते एकत्र येतात. स्वार्थ संपला की सर्व जण बाजूला जातात. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक स्वबळावर करण्याचे सांगणाऱ्यानी एखादी तरी निवडणुक स्वबळावर लढून दाखवावी. काष्टी ग्रामपंचायत निवडणुकीत आम्हाला मदत मागितली म्हणूनच आम्ही मदत केली असल्याचे त्यांनी सांगितलं. दरम्यान, बाजार समिती निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस यांच्या युतीचा निर्णय उद्या जाहीर करणार असल्याचे ते म्हणाले.

तर पत्रकार परिषदेत बोलताना जेष्ठ नेते बाबासाहेब भोस यांनी राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षांनी पक्ष कोणाच्या दावणीला बांधला आहे हे सर्वांना माहीत आहे. कुकडीच्या उष्ट्या पत्रावळीवर जगणाऱ्यांनी मी कोणत्या पक्षात आहे हे विचारण्याची पात्रता आण्णासाहेब शेलार आणि हरिदास शिर्के यांच्यात नाही अशी जहरी टीका दोघांचे नाव घेत केली. यावेळी सुभाष शिंदे, श्रीनिवास घाडगे, राकेश पाचपुते, प्रशांत दरेकर, धर्मनाथ काकडे, प्रा. सुरेश रसाळ उपस्थितीत होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube