मुंबई : राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी वाद ताजा असतानाच मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (chhagan Bhujbal) यांना पत्र पाठवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तुम्हाला उडवण्यासाठी पाच जणांनी 50 लाखांची सुपारी घेतली आहे, सावध राहा, अशा आशयाचा धमकी वजा इशारा या पत्रात देण्यात आला आहे. भुजबळ यांना यापूर्वीही ब्राह्मणविरोधी वक्तव्य केल्याचा दावा करत फोनवरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. (OBC leader Chhagan Bhujbal has been sent a death threat.)
माननीय आमदार छगनजी भुजबळ साहेब यांना साष्टांग नमस्कार, गंगापूर, दिंडोरी येथील चांदणी हॉटेमध्ये बसून पाच जणांनी तुम्हाला उडविण्याची 50 लाखांची सुपारी घेतली आहे. गाडी नंबर MH 15 PG 9303 आणि xxxxxxx74 असा त्याचा नंबर असून या नंबरवरुन तुम्हाला त्याची माहिती मिळेल. तरी या गुंडांपासून सावध रहा, हे पाचही जण तुम्हाला रात्रभर शोधत फिरत आहे. असा मजकूर पत्रात लिहिण्यात आला आहे.
राज्यात मागील दिवसांपासून मराठा समाज विरुद्ध ओबीसी (OBC) असा वाद पाहायला मिळत आहे. शिंदे सरकारने कुणबी नोंदी सापडलेल्यांच्या सग्यासोयऱ्यांनाही कुणबी म्हणून प्रमामपत्र मिळू शकेल अशी अधिसुचना काढली आहे. त्यानंतर भुजबळ यांनी या अधिसुचनेला विरोध करत आपल्याच सरकारविरोधात मोर्चा उघडला आहे. त्यामुळे राज्यातील सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे.
एका बाजूला मराठा समाज आरक्षणासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. तर मराठा (Maratha) समाज कुणबी नोंदीच्या माध्यमातून ओबीसी आरक्षणात घुसखोरी करत आहे, मागच्या दाराने ओबीसी आरक्षणात प्रवेश करत आहे, असा दावा करत छगन भुजबळ यांंच्या नेतृत्वात ओबीसी नेत्यांनी कुणबी प्रमाणपत्राच्या प्रक्रियेला विरोध केला आहे. त्यानंतर आता थेट भुजबळ यांना मारण्याची धमकी आणि सावध राहण्याचा इशारा देणारे पत्र आल्याने खळबळ उडाली आहे.