Abhishek Ghosalkar हत्या प्रकरणात पहिली अटक : मॉरिसशी थेट संबंध, नेमके कारण समोर येणार?
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे सुपुत्र माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्या हत्या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने एकाला अटक केली आहे. मॉरिस (Mumbai News) नारोन्हा उर्फ मॉरिस भाई याचा मागील तीन ते चार महिन्यांपासून बॉडीगार्ड म्हणून काम करणाऱ्या अमरेंद्र मिश्रा याला अटक केली आहे. त्याच्याच बंदुकीने मॉरिस याने अभिषेक यांच्यावर गोळ्या झाडल्याचा दावा करत शस्त्रास्त्र कायदा 29 ब आणि 30 अंतर्गत पोलिसांनी ही कारवाई केली आहे. (Mumbai Crime Branch has arrested Amarendra Mishra in the murder case of former corporator Abhishek Ghosalkar.)
मिळालेल्या माहितीनुसार, अमरेंद्र मिश्रा हा मुळचा उत्तर प्रदेशमधील असून त्याला 2003 मध्ये प्रयागराज येथील फुलपूर प्रशासनाने बंदुकीचा परवाना दिला होता. फेब्रुवारी 2026 पर्यंत या परवान्याची मुदत होती. मागील तीन ते चार महिन्यांपासून मिश्रा मॉरिसचा बॉडीगार्ड म्हणून काम करत होता. त्याची परवानाधारक बंदूक त्याच्यासोबत मॉरिस देखील वापरत होता. काल हल्ल्यावेळी त्याची बंदूक मॉरिसच्या ऑफिसच्या लॉकरमध्ये होती. याच लॉकरमधून मॉरिसने बंदूक काढून घोसाळकर यांच्यावर गोळीबार केला. मात्र हा गोळीबार झाला तेव्हा अमरेंद्र मिश्रा तिथे उपस्थित नव्हता, त्यामुळे त्याच्यावर केवळ शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मॉरिसने पाच राऊंड फायर केले अन् स्वत:लाही संपवलं; नेमकं काय घडलं?
दरम्यान, या प्रकरणात मुंबई पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. मेहुल पारीख आणि रोहित साहू अशी या दोघांची नावे आहेत. गोळीबार झाला त्यावेळी यातील एकजण तिथे उपस्थित होता असेही सांगण्यात येत आहे. त्यांच्याकडून मॉरिसने घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडण्यापूर्वी तिथे नेमके काय घडले होते, याबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच मॉरिसने या प्रकरणात कोणाकोणाला सहभागी करुन घेतले होते, मॉरिस अभिषेक यांच्यावर गोळ्या झाडणार याबाबत कोणाला माहिती होती का? हा हल्ला पैशांच्या वादातून झाला की राजकीय वादातून अशा प्रश्नांची उत्तरे मुंबईत पोलीस शोधत आहेत. अशात आता मिश्रा याच्याकडून काही माहिती मिळते का हे पोलीस तपासत आहेत.
नेमकं काय घडलं?
अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस पूर्वीपासून एकमेकांना ओळखत होते. दोघांमध्ये एक वर्षांपूर्वी वादही झाला होता. दोघांमध्ये वैयक्तिक स्वरुपाचे वादही होते. दोघांमधील वाद मिटल्यानंतर दोघेही मॉरिसच्या ऑफिसमध्ये एकत्र आले होते. मॉरिसने स्वतःच्या कार्यालयात त्याने अभिषेक घोसाळकर यांना बोलावलं आणि फेसबुक लाईव्हही केले. त्यावेळी या दोघांनीही एकमेकांबद्दल कौतुकाचं शब्द वापरल्याचं दिसून येते आहे. दोघांमध्ये बोलणं झाल्यानंतर अचानक मॉरिसने घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली.
Nitesh Rane : ‘ठाकरे गटात राऊत विरुद्ध आदित्य गँगवॉर, दोघांची ‘नार्को’ करा’; नितेश राणेंचा पलटवार
मॉरिसने एकूण 5 राऊंड फायर केले या 5 राऊंडपैकी तीन गोळ्या घोसाळकरांना लागल्या आहेत. एक गोळी अभिषेक घोसाळकरांच्या डोक्यात लागली तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. तर इकडे मॉरिस यानेही स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. मॉरिस आणि घोसाळकर यांच्यात पैशांचा व्यवहार झाला होता, त्याच व्यवहारातून ही घटना घडल्याचे समोर येत आहे. याबाबत सविस्तर पोलिस तपास सुरू आहे. त्यामुळे या भागात तणाव निर्माण झाला आहे.