खाकीला ‘रील्स’वर ब्रेक, महाराष्ट्र पोलिसांचा कडक आदेश, नियमभंग केल्यास शिस्तभंग कारवाई

गणवेशात असताना पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने सोशल मीडियासाठी व्हिडिओ तयार करून पोस्ट करू नयेत, असे स्पष्ट आदेश जारी करण्यात आले आहेत.

Untitled Design 88

Untitled Design 88

Police banned from posting videos on social media in uniform : सोशल मीडियावर वाढत चाललेल्या रिल्स आणि मिनी ब्लॉगच्या ट्रेन्डला लगाम लावण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी एक कठोर पाऊल उचललं आहे. गणवेशात असताना कोणत्याही पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने सोशल मीडियासाठी व्हिडिओ तयार करून पोस्ट करू नयेत, असे स्पष्ट आदेश जारी करण्यात आले आहेत. आदेशाचं उल्लंघन केल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा देखील देण्यात आला आहे.

विशेष शाखेचे उपयुक्त दत्तात्रय कांबळे यांनी काढलेल्या परिपत्रकानुसार, हा आदेश राज्यातील सुमारे 51 हजार पोलीस कर्मचाऱ्यांना लागू राहणार आहे. अलीकडील काळात अनेक कर्मचारी गणवेशात खाकी सवग दाखवणारे रिल्स, मिनी ब्लॉग किंवा इतर प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असल्याचे वरिष्ठांच्या निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर विभागाने ही कठोर भूमिका घेतली आहे.

परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे, अशा व्हिडिओंमध्ये नकळत कार्यालयीन परिसर, शासकीय वाहने, शस्त्रसामग्री, उपकरणे किंवा कर्तव्याशी संबंधित संवेदनशील बाबी दिसून येतात. यामुळे विभागाच्या गोपनीयतेला आणि कार्यात्मक सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यापुढे अशा प्रकारचे व्हिडिओ आढळल्यास तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मोठी बातमी; शरद पवारांची 15 दिवसांत दुसऱ्यांदा प्रकृती खालावली; रुबी हॉल क्लिनिकमध्ये केले दाखल

या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी मुंबई पोलीस दलातील सोशल मीडिया लॅबवर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवून नियमभंगाच्या घटना नोंदवणे आणि त्याबाबत वरिष्ठांना अहवाल सादर करणे, अशी जबाबदारी या यंत्रणेला देण्यात आली आहे. दरम्यान, ‘खाकी स्वॅग’च्या वाढत्या ट्रेंडमुळे हा मुद्दा विधानभवनात देखील उपस्थित करण्यात आला होता. काही आमदारांनी लक्षवेधी सूचना मांडत या प्रकारावर नियंत्रण आणण्याची मागणी केली होती.

यापूर्वीच जुलै 2025 मध्ये राज्य सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापराबाबत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली होती. त्यानुसार वैयक्तिक आणि अधिकृत सोशल मीडिया खाती वेगळी ठेवणे, शासकीय पदनाम, लोगो किंवा कार्यालयाचा पत्ता वैयक्तिक खात्यावर वापरू नये, तसेच कोणतीही गोपनीय माहिती पूर्वपरवानगीशिवाय प्रसारित करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. नव्या आदेशामुळे पोलिस दलातील सोशल मीडिया वापरावर अधिक कडक नियंत्रण येणार असून, शिस्त आणि गोपनीयता राखण्यावर विभागाने भर दिला आहे.

Exit mobile version