Rajya Sabha Election 2026 : निवडणूक आयोगाकडून राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. या 37 जागांपैकी 7 जागा महाराष्ट्रातील असल्याने सत्ताधारी भाजपकडून यंदा राज्यसभेसाठी कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी वाढली आहे. तसेच यावेळी निष्ठावंतांना संधी देण्यात यावी अशी मागणी आता भाजपच्या एका गटाकडून करण्यात येत आहे.
गेल्या काही वर्षांत बाहेरून आलेल्यांना राज्यसभा किंवा विधान परिषेदेसाठी भाजपकडून संधी देण्यात आल्याने आता पक्षातील निष्ठावंतांना प्राधान्य द्यावे अशी मागणी भाजपच्या (BJP) एका गटाकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे राज्यसभेसाठी भाजपकडून विनोद तावडे (Vinod Tawde), रामदास आठवले (Ramdas Athawale) , विजया रहाटकर (Vijaya Rahatkar) , भागवत कराड (Bhagwat Karad) आणि धैर्यशील पाटील (Dhairyasheel Patil) यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र राज्यसेभेसाठी भाजप कुणाला संधी देणार याबाबत कोणतीही माहिती आतापर्यंत भाजपने अधिकृतरित्या दिलेली नाही.
सध्या महाराष्ट्र विधानसभेत 284 आमदार असल्याने राज्यसभेच्या (Rajya Sabha Election 2026) एका उमेदवाराला विजयासाठी 37 मतांची आवश्यकता आहे. महायुतीकडे 235 आमदार असल्याने महायुतीचे सहा उमेदवार जिंकणार आहे. 6 पैकी 4 जागांवर भाजप आणि एक-एक जागेवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीकडून उमेदवार देणार असल्याचे सांगितलं जात आहे. तर महाविकास आघाडीकडून पुन्हा एकदा शरद पवार यांना संधी मिळणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे.
शरद पवार, रामदास आठवले, फौजिया खान, रजनी पाटील, प्रियांका चतुर्वेदी, धैर्यशील पाटील आणि भागवत कराड यांचा राज्यसभेत कार्यकाळ संपल्याने राज्यसभेच्या 7 जागांवर निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली आहे.
राज्यसभा निवडणूक 2026 कार्यक्रम
सूचना जारी: 26 फेब्रुवारी 2026
अर्ज भरण्याची अंतिम तारीख: 5 मार्च 2026
अर्जांची छाननी: 6 मार्च 2026
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 9 मार्च 2026
मतदान: 16 मार्च 2026 (सकाळी 9.00 ते सायंकाळी 4.00)
मतमोजणी: 16 मार्च 2026, सायंकाळी 5.00
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख: 20 मार्च 2026
T20 World Cup भारताचा पुढचा सामना कधी? एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
