अहमदनगर : महाराष्ट्रात ताकद वाढविण्याच्या प्रयत्नात असलेल्या भारत राष्ट्र समितीच्या गळाला अहमदनगर जिल्ह्यातील बडा नेता लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निष्ठावंत आणि निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणाऱ्या माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचा भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांसह मुरकुटे भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश करणार आहेत. (Sharad Pawar’s close aid former MLA Bhanudas Murkute will join the Bharat Rashtra Samiti)
मुरकुटे यांच्यासोबत श्रीरामपुरमधील अशोक सहकारी साखर कारखान्याचे सर्व आजी-माजी संचालक दाखल झाले आहेत. त्यामुळे भारत राष्ट्र समितीला आता महाराष्ट्रातील पहिला साखऱ कारखाना मिळाला आहे. यानंतर चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रातील सहकाराच्या राजकारणातही प्रवेश केला आहे. मुरकुटे यांच्यासह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी 7 जुलैला हैदराबाद येथे चंद्रशेखर राव यांची भेट घेतली होती.
कोण आहेत भानुसाद मुरकुटे?
भानुदास मुरकुटे हे मुळचे शरद पवार यांचे समर्थक आणि निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. 1990 साली ते जनता दलाच्या तिकीटावर तर 1995 साली ते काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते. त्यानंतर शरद पवार यांच्यासह त्यांनी काँग्रेसला रामराम करत स्थापनेपासूनच राष्ट्रवादीचे सक्रिय सदस्य होते. मात्र नंतरच्या काळात शिर्डी लोकसभा मतदारसंघातून त्यांनी शिवसेनेकडून दिवंगत बाळासाहेब विखे यांच्याविरूद्ध निवडणूक लढवली होती. त्यात मुरकुटेंचा पराभव झाला होता. त्यानंतर ते श्रीरामपुरमध्ये लोकसेवा विकास आघाडीच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून राजकारण करत आहेत.
तेलंगणातील सत्ताधारी पक्ष मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात ताकद वाढवत आहे. मागील काही दिवसांपासून त्यांनी महाराष्ट्रात राजकीय सक्रियता वाढवली आहे. नांदेड, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर इथे सभा घेऊन भारत राष्ट्र समितीसाठी जमीन तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय मोठ्या संख्येनं आमदार, एका माजी खासदार महोदयांनाही त्यांनी पक्षाच्या गोटात दाखल करुन घेतलं आहे. नांदेडमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवत त्यांनी प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणातही प्रवेश केला आहे. अशात आता त्यांनी सहकाराच्या राजकारणातही प्रवेश केला आहे.