महापालिका निवडणुकीची धामधुम जोरात सुरू आहे. अशातच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जबर धक्का बसला आहे. (Mumbai) ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईच्या माजी महापौर आणि शिव आरोग्य सेनेच्या अध्यक्षा शुभा राऊळ यांनी शिवसेना पक्षाचा राजीनामा दिला. शुभा राऊळ यांनी भाजप नेते आशिष शेलार यांची भेट घेतली असून त्या लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
माजी महापौर शुभा राऊळ यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा पत्र दिलं आहे. त्यांनी शिव आरोग्य सेनेच्या अध्यक्षपदाचा आणि शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. शुभा राऊळ यांच्या नाराजीचं कारण अद्याप समोर आलं नाही. अगदी थोडक्या शब्दांमध्ये शुभा राऊळ यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला. ठाकरेंची साथ सोडल्यानंतर शुभा राऊळ आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
मला माझे पप्पा आणून द्या; हत्या झालेल्या मनसे पदाधिकाऱ्याच्या मुलीचा अमित ठाकरेंपुढं टाहो
शुभा राऊळ यांनी आमदार प्रवीण दरेकर यांच्या निवासस्थानी मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली. त्यानंतर शुभा राऊळ या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे. शुभा राऊळ या ठाकरेंच्या शिवसेनेच्या एक मोठ्या महिला नेत्या मानल्या जातात. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी त्यांच्या युतीचा वचननामा जाहीर केला असताना त्याच दिवशी शुभा राऊळ यांनी राजीनामा दिल्याने तो ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जातोय. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आज ठाकरे बंधूंनी ‘शब्द ठाकरेंचा’ हा वचननामा प्रसिद्ध केला. यामध्ये मुंबईकरांच्या आयुष्यावर मोठा परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.
पाळणाघरे, पाळीव प्राणी, पाणी आणि सांडपाणी, रस्ते, कचरा व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण, रोजगार यासह अनेक गोष्टी आहेत. हा वचननामा या महानगरपालिका निवडणुकीमध्ये गेमचेंजर ठरणार का अशी चर्चा सध्या सुरू आहे. दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी शिवसेना भवनात संयुक्त पत्रकार परिषद घेऊन मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसे आणि शिवसेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यानिमित्ताने राज ठाकरे तब्बल 20 वर्षांनी शिवसेना भवनात गेले.. यावेळी संजय राऊतांनी राज ठाकरेंचं स्वागत केलं.
