खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare), मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare), पालकमंत्री आदिती तटकरे, विधानपरिषदेवर आमदार अनिकेत तटकरे. रायगडमध्ये मागचे पाच तटकरे कुटुंबियांची ही दादागिरी शिवसेनेने (Shivsena) आणि आमदार भरत गोगावले (Bharat Gogavle) यांनी सहन केली. आताही नाय होय करत गोगावले मंत्री झाले पण पालकमंत्रीपद आदिती तटकरेंकडे गेले. राष्ट्रवादीच्या त्या जिल्ह्यातील एकमेव आमदार, तर शिवसेनेचे तीन आमदार. त्यानंतरही पालकमंत्रीपद तटकरेंकडे गेल्याने गोगावले चांगलेच दुखावले गेले. त्यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर रविवारी सुट्टीवर असलेल्या अधिकार्यांना मंत्रालयात बोलवून रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली. इथेच गोगावले यांनी अर्धा डाव जिंकला.
एका बाजूला गोगावले विरूद्ध तटकरे यांच्यात हा वाद सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला भाजपने एक मोठी खेळी केलीय.दोघांच्या भांडणात तिसऱ्याच लाभ या उक्तीप्रमाणे भाजपला या खेळीचा फायदा होण्याची शक्यता आहे. महाडच्या माजी नगराध्यक्षा, तटकरे आणि गोगावले यांच्या कट्टर विरोधक स्नेहल जगताप यांच्यासाठी भाजपने पायघड्या अंथरल्या आहेत. लवकरच जगताप यांचा पक्षप्रवेश होणार आहे. भाजपच्या या खेळीला गोगावले, तटकरे यांच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी महत्वाचे मानले जाते. जगताप कुटुंबियांना असलेला जनाधार आणि त्यांना भाजपचे मिळणारे बळ यामुळे आगामी काळात महाडमधील राजकीय समीकरण बदलणार हे नक्की आहे. (Snehal Jagtap, a staunch opponent of Ministers Bharat Gogavale and Sunil Tatkare, will join BJP)
स्नेहल जगताप यांच्या घराला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. आबा म्हणून प्रसिद्ध असलेले महाडचे दिवंगत माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या त्या कन्या आहेत. आबा आता हयात नसले तरी तालुक्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आजही आहे. कधी काँग्रेस, कधी राष्ट्रवादी काँग्रेस तर कधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून जगताप कुटुंबिय मागच्या चार दशकांपासून आपले अस्तित्व टिकवून आहे. महाड नगरपरिषदेवर दोन दशकांपासूनच वर्चस्व राखून आहे. यात स्नेहल जगतापही नगराध्यक्षा राहिल्या आहेत.
जगताप कुटुंबियांचा राजकीय इतिहास बघितल्या हे घराणे हे मुळचे काँग्रेसचे. रायगड हा कधी काळी समाजवाद्यांचा बालेकिल्ला होता. प्रजा समाजवादी, जनता पक्ष, शेकाप यांचे काँग्रेसला कायमच आव्हान होते. अशात 90 च्या दशकात शिवसेनेनेही जोरदार एन्ट्री घेतली. काँग्रेस आणि शेकापच्या वर्चस्वाला धनुष्य बाणाने हादरा दिला. शिवसेनेचे प्रभाकर मोरे हे 1990 मध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि विजयीही झाले. समाजवादी मतांवर शिवसेनेने कब्जा मिळविला. पण रायगडमध्ये काँग्रेसची जिल्ह्यातील ताकद टिकून होती. ही ताकद टिकवून ठेवण्यात माणिकराव जगताप यांचाही मोठा वाटा होते.
मात्र मोरे यांच्या विजयाने रायगडमध्ये काँग्रेस विरूद्ध शिवसेना विरूद्ध शेकाप असे तिहेरी संघर्षाचे नवे पर्व सुरू झाले. त्यामुळे काँग्रेसने सुधाकर सावंत यांना डावलून अरूण देशमुख यांना उमेदवारी दिली. सावंत यांच्या बंडखोरीने मतविभागणी झाली आणि 1995 मध्येही प्रभाकर मोरे विजयी झाले. युती सरकारमध्ये ते प्रथम गृह व उद्योग राज्यमंत्री व नंतर ग्रामविकास मंत्री झाले. याच दरम्यान, सुधाकर सावंत यांचे राजकीय शिष्य माणिकराव जगताप यांचे नेतृत्व उदयास येऊ घातले होते. ते रायगड जिल्हा परिषदेच्या महाड तालुक्यातील वाळण, दासगांव आणि नाते मतदार संघांतून निवडून आलेले होते. काँग्रेसचे सरचिटणीसही होते. माणिकराव जगताप यांनी 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
त्यावेळी मंत्री राहिलेल्या प्रभाकर मोरे यांच्यासमोर माणिकराव जगताप यांचे आव्हान नगण्य वाटत होते. मात्र काँग्रेस माणिक जगताप यांच्या पाठिशी एकवटली. बंडखोरी टळल्याने मतविभाजनही टळले. पण पोलादपूरच्या सुरेश जाधव यांनी तीन हजार 630 मते घेतली आणि हिच माणिक जगताप यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली. 2004 मध्ये मात्र माणिक जगताप यांनी 56 हजार 972 मते मिळवून तीन वेळा निवडून आलेल्या आमदार प्रभाकर मोरे यांचा पराभव केला.
2009 मध्ये रायगड लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली. शिवसेनेच्या अनंत गीते यांनी बॅ. अंतुले यांचा पराभव केला. त्याच धर्तीवर 2009 मध्ये महाड विधानसभा मतदार संघाचीही पुनर्रचना करण्यात आली. यावेळी प्रभाकर मोरे यांच्याऐवजी शिवसेनेने रायगड जिल्हा परिषदेत बांधकाम सभापती असलेल्या भरत गोगावले यांना उमेदवारी दिली. गोगावले यांना 85 हजार 650 मते मिळून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिक जगताप यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. या पराभवाला सुनिल तटकरे जबाबदार असल्याचे बोलले जाऊ लागले. इथूनच जगताप यांचे तटकरे यांच्याशी बिनसले. मात्र जगताप यांनी हार मानली नाही. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था कोकण विभागीय मतदार संघाच्या विधानपरिषद पोटनिवडणुकीत अनिल तटकरेंच्या विरोधात बंडखोरी करून उमेदवारी केली आणि ते पराभूत झाले.
यानंतर माणिक जगतापांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. पण 2014, 2019 मध्येही गोगावले विरूद्ध जगताप यांच्या लढाईत गोगावले बाजी मारत आले. जुलै 2021 मध्ये जगताप यांचे निधन झाले. पण या आघातातून सावत स्नेहल जगताप 24 तासात मैदानात उतरल्या. महाप्रलयात सापडलेल्या महाडकर नागरिकांच्या समस्या पूर्ततेसाठी पदर खोचून कामाला लागल्या. हे चित्र महाडची जनता अजूनही विसरलेली नाही. 2023 मध्ये जगताप यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांना गोगवलेंविरोधात उमेदवारी मिळाली. गोगवलेंना विजयासाठी बराच संघर्ष करावा लागला. अवघ्या 21 हजार मतांनी गोगवले विजयी झाले.
आता याच स्नेहल जगताप भाजपच्या वाटेवर आहेत. त्यांच्या प्रवेशाने महाडमध्ये भाजपला चेहरा मिळू शकतो. माणिकराव जगताप यांना मानणारा वर्ग, स्थानिक राजकारणातील स्वतः जगताप यांची ताकद आणि भाजपचे इंजिन याआधारे जगताप यांच्याकडे गोगावले आणि तटकरे यांना वरचढ ठरू शकणारा चेहरा म्हणून पाहिले जात आहे. यात आता भाजपला कितपत यश येणार हे येणाऱ्या काळातच समजून येईल.