Chandrashekhar Bawankule : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु असतानाच आता महायुतीकडून पहिल्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. महायुतीकडून अमरावती लोकसभेसाठी अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. यांसदर्भातील माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे.
‘तुमचे हात सरकारच्या कानाखाली आपटले तर…’; अंगणवाडी सेविकांच्या मोर्चातून ठाकरेंचा हल्लाबोल
अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडे दोन आमदार असल्याचं म्हणत प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी मागणी केली होती. याच मतदारसंघात अपक्ष खासदार नवनीत राणा यांची पकड चांगली आहे. जर राणा यांना उमेदवारी पाहिजे असल्यास त्यांनी प्रहारकडूनच लढावं, असंही ते म्हणाले होते. बच्चू कडू यांच्या मागणीनंतर महायुतीतील घटक पक्षांनी चर्चा करुन नवनीत राणाच मोठ्या मताधिक्क्याने विजयी होणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता नवनीत राणा यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगण्यात येत आहे. राण अमरावतीतून 51 टक्के मताधिक्क्याने निवडून येणार असल्याचा विश्वासच बावनकुळेंनी यावेळी व्यक्त केला आहे.
Lok Sabha 2024 : ‘होय, लोकसभा लढणारच!’ राणी लंकेंच्या घोषणेने नगरच्या निवडणुकीत ट्विस्ट
2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. त्यानंतर 2019 च्या लोकसभेत राणा यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंबा घेत दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत त्यांनी तत्कालीन खासदार आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. त्यामुळे आता महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अपक्ष खासदार नवनीत राणा कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार हे अद्याप अस्पष्ट आहे.
दरम्यान, नवनीत राणा यांना महायुतीकडून जरी उमेदवारी मिळाली तरीही त्या नेमक्या कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार हे स्पष्ट झालं नाही. एकीकडे प्रहारचे बच्चू कडू यांनी आपल्या प्रहार संघटनेकडून निवडणूक लढवावी अशी मागणी केलीयं. तर भाजपकडून उमेदवारी मिळाल्यानंतर कोणत्या तिकीटावर निवडणूक लढवणार हे जाहीर केलेलं नाही.
आमदार बच्चू कडू यांच्या ऑफरवर खासदार नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांनी त्यांचे आभार मानले आहेत. त्याचवेळी ते म्हणाले की, खासदार नवनीत राणा या युवा स्वाभिमानी पक्षाच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत. प्रहारने जी ऑफर दिली आहे, त्याबद्दल धन्यवाद पण नवनीत राणा या अमरावती जिल्ह्यात खासदार आहेत. त्या महायुतीच्या सोबत आहेत, म्हणून मला असं वाटतं की, आमदार बच्चू कडू हे महायुती धर्म पाळतील, असं म्हणत आमदार कडूंना आमदार रवी राणा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.