Lok Sabha 2024 : ‘होय, लोकसभा लढणारच!’ राणी लंकेंच्या घोषणेने नगरच्या निवडणुकीत ट्विस्ट
Lok Sabha 2024 : राज्याच्या राजकारणात नगर जिल्ह्याचा (Lok Sabha 2024) चांगलाच दबदबा आहे. साखरसम्राटांचाही जिल्हा म्हणून नगरचं नाव आहे. सरकार कोणाचंही असो मंत्रीपदात नगर जिल्ह्याला झुकतं माप मिळतंच. आताही राज्याचं महसूल खातं राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या रुपात नगर जिल्ह्याकडेच आहे. अशा राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या नगर जिल्ह्यात निवडणुकांचे ढोल वाजण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही मतदारसंघांसाठी जोरदार चढाओढ सुरू झाली आहे. उत्तरेच्या तुलनेत दक्षिणेच्या जागेसाठी जास्तच राजकारण पाहण्यास मिळत आहे.
ठाकरे गटाकडून आमदार शंकरराव गडाख तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून आ. रोहित पवार आणि आ. प्राजक्त तनपुरे यांची नावे पुढे केली जात आहेत. यात आता अनपेक्षितपणे अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंकेंनी एन्ट्री घेतली आहे. राणी लंके यांनी स्वतः नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ‘लोकसभेला समोर कुणीही उमेदवार असला तरी त्याचे आम्हाला काही घेणे देणे नाही. मात्र मी जनतेच्या विकासासाठी लोकसभा निवडणूक लढणार आहे’, असे राणी लंके म्हणाल्या.
Lok Sabha Election : शरद पवारांचे शिलेदार करणार विखेंची कोंडी; नगरसाठी राष्ट्रवादीचा मोठ्ठा ‘डाव’
जिल्ह्यात शिर्डी आणि नगर दक्षिण असे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. उत्तेरत शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे खासदार आहेत. तर दक्षिणेची जागा भाजपाच्या ताब्यात आहे. येथे डॉ. सुजय विखे पाटील खासदार आहेत. यंदाही विखेंनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यांच्या यंत्रणेने कामाला सुरुवातही केली आहे. मात्र, यंदा विखेंना निवडणूक सोपी नाही असेच दिसत आहे. एकतर मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढली आहे. भाजप आमदार राम शिंदेही निवडणुकीसाठी तयार असल्याचे सांगत आहेत. विखे आणि त्यांच्यातील धुसफूस समोरही आली होती. दिवाळी फराळाच्या निमित्ताने राम शिंदे थेट आमदार निलेश लंकेंबरोबर दिसले होते. या राजकारणामुळे विखेंची धाकधूक वाढली आहे.
त्यात विखेंना टक्कर देईल असा उमेदवार विरोधी पक्षांकडून शोधला जात आहे. आमदार निलेश लंके स्वतःच निवडणूक लढणार असे मध्यंतरी सांगितले जात होते. मात्र नंतर लंके अजितदादांच्या गटात सहभागी झाले. त्यामुळे त्यांचे नाव मागे पडले. जागावाटपात दक्षिण मतदारसंघ भाजपकडेच राहिल असं दिसत आहे. अशा परिस्थितीत आता राणी लंके यांनीही निवडणूक लढणार असल्याचे संकेत दिल्याने नवी समीकरणे तयार होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
Lok Sabha 2024 : तनपुरे लागले तयारीला.. सुजय विखेंना मिळणार तगडी फाईट?
सध्या भाजप आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी गट हा महायुतीत सत्तेत आहे. मात्र तरी देखील कधी निलेश लंके तर कधी राणी लंके यांच्या लोकसभा उमेदवारीची चर्चा होत असते. मात्र आता खुद्द राणी लंके यांनी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर सांगितले आहे. लोकसभेला समोर कुणीही उमेदवार असला तरी त्याचे आम्हाला काही घेणे देणे नाही. मात्र मी जनतेच्या विकासासाठी लोकसभा निवडणूक लढणार आहे, असे राणी लंके म्हणाल्या.
सध्या वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या बॅनरवर राणीताई लंके यांचे फोटो दिसत आहेत. विशेष म्हणजे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विविध तालुक्यात बॅनर्स झळकले होते. यातच नवरात्रीत मोहटादेवी दर्शनाच्या बॅनर्सवर देखील लंके यांचे फोटो होते. यामुळे आता विखेंच्या विरोधात महायुतीमध्ये सहभागी असलेले आमदार निलेश लंके यांच्या पत्नी या निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याने आता राजकीय खळबळ उडाली आहे.