Maharashtra Elections 2024 : राज्याच्या विधानसभा निवडणुकीचं (Maharashtra Elections 2024) रण आता चांगलंच तापलं आहे. राजकीय पक्षांकडून उमेदवारी याद्या जाहीर करून तिकीटवाटपाचा कार्यक्रम सुरू झाला आहे. यामध्ये महायुतीने आघाडी घेतली आहे. सर्वात आधी भाजपने 99 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर काल उशिरा शिंदे गटानेही पहिली यादी जाहीर केली. दुसरीकडे महाविकास आघाडीतील एकाही पक्षाची यादी अद्याप जाहीर झालेली नाही. काही ठिकाणी धुसफूस सुरू असल्याच्या बातम्या आल्या होत्या. यातच आता ठाकरे गटाला धक्का देणारी बातमी आली आहे. गेल्या दहा महिन्यांत दहा मिनिटंही भेटीची वेळ मिळाली नाही अशी खंत व्यक्त करत बंजारा समाजाच्या पोहरागदेवी संस्थानचे महंत सुनील महाराज यांनी शिवसेना उबाठा (Shivsena UBT) पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे.
नार्वेकरांच्या अमित शहांना शुभेच्छा! उद्धव ठाकरे अन् भाजप संघर्षाचा दाखला देत सोशल मीडियावर टीका
निवडणूक अगदी जवळ आलेली असताना सुनील महाराज यांनी घेतलेला हा निर्णय ठाकरे गटासाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. सुनील महाराज ठाकरे गटाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याच्या चर्चा होत्या. ठाकरे गटाची यादी अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे सुनील महाराज यांना उमेदवारी मिळणार का असा प्रश्न उपस्थित केला जात होता. या प्रश्नाचं उत्तर मिळण्याआधीच त्यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केला. उद्धव ठाकरेंना पत्र लिहून आपण पक्ष सोडत असल्याचे सांगितले.
आपण 9 जुलै 2023 रोजी बंजारा समाजाची काशी पोहरादेवी येथे दर्शनासाठी आला होता. त्यानंतर फेब्रुवारी 2024 मध्ये जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने कारंजा आणि वाशिममध्ये आला होता. या भेटी सोडल्या तर पुन्हा आपली दहा मिनिटांची भेट होण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत आहे. परंतु, आपल्याकडून भेट दिली जात नव्हती. त्याबद्दल मला शल्य वाटतं. मागील दहा महिन्यांपासून मातोश्रीवर भ्रमणध्वनीद्वारे कार्यालयात आणि रवी म्हात्रे यांना संपर्क करत आहे. तरी सुद्धा दखल घेतली जात नाही. मी पक्षात काही नवीन कार्यकर्त्यांच्या प्रवेशाची यादी दिली होती. या कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला पण मला साधे निमंत्रण सुद्धा देण्यात आलं नाही.
मला पक्षाचं काम करायचं आहे. त्यासाठी निवडणुकीत तिकीट मिळालं पाहिजे हा काही माझा उद्देश नाही. पक्षप्रमुख म्हणून काही कटू निर्णय घ्यावे लागतात हे मलाही मान्य आहे. परंतु मी दहा महिन्यांपासून प्रयत्न करत आहे तरीदेखील साधी दहा मिनिटांची भेटही मिळू शकत नसेल तर पक्षाला माझी गरज नाही असा अर्थ यातून सिद्ध होतो. म्हणून मी अतिशय जड अंतःकरणाने शिवसेना पक्षाचा राजीनामा आपल्याकडे या पत्राद्वारे सादर करत आहे, असे महंत सुनील महाराज यांनी या पत्रात म्हटले आहे.
उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्री व्हावं, आमदार यशोमती ठाकूर यांचे मोठे विधान