अहमदनगर : मी शांत आहे तोपर्यंत ठीक आहे, मात्र ठरवलं त्यांचा कार्यक्रम करत असतो, हा माझा स्वभाव आहे. परंतु आता थांबायचं नाही. शेवगावात येऊन भांडणे लावायची,जनतेला भावनात्मक करून,जातीयवाद करून मते मिळवायची. आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची हा विद्यमान लोकप्रतिनिधी (Monica Rajle) यांचा धंदा असून विद्यमान लोकप्रतिनिधींचा आगामी विधानसभा निवडणुकीत पराभव करायचा हे एकमेव ध्येय समोर ठेऊन कार्यकर्त्यांनी उघड भूमिका घेत आगामी संघर्षासाठी सज्ज राहावे, असे आवाहन माजी आमदार चंद्रशेखर घुले (Chandrasekhar Ghule) यांनी केले.
जिल्हा सहकारी बँकेच्या (District Central Bank) नुकत्याच झालेल्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत चंद्रशेखर घुले यांचा बँकेत महाविकास आघाडीचे स्पष्ट बहुमत असतानाही अवघ्या एक मताने पराभव झाला. हा पराभव घुले व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. या पार्श्वभूमीवर आज कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे शेवगाव येथे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी घुले बोलत होते.
Ramdas Kadam : परब यांनी सदानंद कदमला बळीचा बकरा बनवलयं
या मेळाव्यात ते जिल्हा बँकेत झालेल्या घडामोडींवर भाष्य करतील अशी उपस्थिताना अपेक्षा होती. परंतु त्यांनी ते टाळले. मात्र विद्यमान आमदार मोनिका राजळे यांच्यावर मात्र नाव न घेता जोरदार टीका केली.सन २०१४ नंतर प्रथमच त्यांनी आमदार मोनिका राजळे यांच्यावर जोरदार टीका केल्यामुळे सर्वत्र याची चर्चा होत आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार नरेंद्र घुले होते.तर राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे उपस्थित होते.
यावेळी घुले म्हणाले, विद्यमान लोकप्रतिनिधी या मताचे राजकारण करतात,कोणत्या गावात किती मते मिळाली हे पाहून निधी दिला जातो.गेल्या साडे आठ वर्षाच्या कालावधीत १२०० कोटी रुपयांची कामे केल्याचे त्या सांगतात. मात्र कामे तर कोठेच दिसत नाहीत.केवळ भावनात्मक बोलून आपला स्वार्थ साधत मूळ प्रश्नांना बगल द्यायची हे त्यांचे उद्योग आहेत. त्यांच्या या भूलभूलैय्याला बळी पडू नका.लवकरच मतदार संघातील प्रत्येक गावात राष्ट्रवादी तर्फे संघर्ष यात्रा काढली जाणार असून त्यात लोकप्रतिनिधींचा पोलखोल करू.
यावेळी प्रताप ढाकणे म्हणाले, जिल्हा बँकेत अध्यक्षपदाच्या झालेल्या निवडणुकीत अचानक काय घडलं याचा खुलासा नेतृत्वाने घेतला पाहिजे. बँकेत पक्षीय राजकारण नव्हतं मग त्यांनी (विरोधकांनी) पक्षीय भूमिका कशी घेतली. तक्रार किंवा विरोध असेल तर आपल्या संचालकांनी नेतृत्वाने घेतलेल्या बैठकीतच बोलायला पाहिजे होते. या संचालका विरुध्द पक्षाने कठोर भूमिका घेतली नाही तर विचार करावा लागेल.