Solapur News : माढा मतदारसंघात सलग सहा टर्म आमदार. बबनराव शिंदे. आता माजी आमदार आहेत. मुलाला आमदार करण्यासाठी त्यांनी जंग जंग पछाडलं. पण यंदा यश मिळालं नाही. शरद पवार गटाचे उमेदवार अभिजीत पाटील यांनी बबनराव शिंदे यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे यांचा पराभव केला. या पराभवानंतर आता बबनराव शिंदे नवी राजकीय खेळी करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. शिंदे भाजपात जाणार की आणखी काही वेगळी भूमिका घेणार असे प्रश्न विचारले जात आहेत. या प्रश्नांचं उत्तर स्वतः बबनराव शिंदे यांनीच दिलं आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुलाच्या पराभवानंतर बबनराव शिंदे यांनी माढ्यातील पिंपळनेर येथे संवाद मेळावा घेतला होता. या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या. सत्तेत जा, विधानपरिषद तरी घ्या अशी मागणी केली. यानंतर बबनराव शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा माढ्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. या सर्व घडामोडींचा खुलासा शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.
शिंदे म्हणाले, माढा मतदारसंघातील निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलं. पण यश मिळालं नाही. त्यामुळे पराभव झाला. राजकारणात अशा गोष्टी घडत असतात. निवडणुकीत घड्याळ न घेणं महागात पडलं असं वाटतं का, असे विचारले असता दोन्ही बाजूने लोक बोलत असतात. त्यामुळे यावर फार भाष्य करणं मला योग्य वाटत नाही असे थोडक्यात उत्तर त्यांना दिले.
माढा-सोलापुरात महायुतीला पाठिंबा अन् चमत्कार घडला; बड्या नेत्याच्या कारखान्याची जप्ती टळली
आगामी काळात शिंदे कुटुंबीय वेगळ्या पक्षात जातील असं वाटतं का या प्रश्नावरही याबाबतीत मला आज तरी काही बोलता येणार नाही. परंतु, पूर्वीपासून मी ज्या फळीत काम करतोय भविष्यातही त्याच फळीत काम करणार आहे असं कोड्यातलं उत्तर माजी आमदार शिंदे यांना दिलं. मागील काही दिवसांत जयकुमार गोरे, राम सातपुते यांच्या भेटी झाल्या आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या आपण संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. आगामी काळात आपण भाजपात जाणार असं बोललं जात आहे असे पत्रकारांनी विचारले असता माझी कुणाचीही भेटगाठ झालेली नाही. अजून आम्ही याबाबत काहीच निर्णय घेतलेला नाही अशा संक्षिप्त शब्दांत माजी आमदार बबनराव शिंदे यांनी उत्तर दिले.
दरम्यान, बबनराव शिंदे यांनी अजून आपले पत्ते उघड केले नसले तरी त्यांच्या मनात चलबिचल मात्र सुरू आहे. कार्यकर्त्यांनी तर आपल्या भावना मेळाव्यातच बोलून दाखवल्या आहेत. त्यामुळे आता शिंदे कुटुंबीय आगामी काळात काय निर्णय घेतात. निवडणुकीच्या काळात महायुतीची साथ सोडली होती. आता पुन्हा महायुतीला सोबत घेणार का, भाजपात प्रवेश करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
बबन शिंदेंनी अभिनंदन केलं नाही मीच त्यांना भेटायला जाणार; अभिजित पाटलांनी क्लिअर सांगितलं