माढा-सोलापुरात महायुतीला पाठिंबा अन् चमत्कार घडला; बड्या नेत्याच्या कारखान्याची जप्ती टळली

माढा-सोलापुरात महायुतीला पाठिंबा अन् चमत्कार घडला; बड्या नेत्याच्या कारखान्याची जप्ती टळली

Madha Lok Sabha Election : माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला धक्का देऊन महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्यासाठी फलदायी ठरला आहे. सोलापूर आणि माढ्यात महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा पाटील यांनी दोनच दिवसांपूर्वी जाहीर केला होता. त्यानंतर लगेचच गुडन्यूज मिळाली.

माढा, सोलापुरात राजकीय गुगली! मविआला धक्का, बड्या नेत्याचा भाजपला पाठिंबा

राज्य सहकारी बँकेने थकबाकीचे कारण देत पंढरपुरातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर कारवाई केली. परंतु, ही कारवाई बेकायदेशीर आण लहरीपणाची आहे असे मत व्यक्त करत कारखान्याची गोदामांचे सील काढून त्यांचा ताबा पुन्हा कारखान्याकडे द्या असा आदेश पुणे येथील कर्ज वसूली लवादाने दिल्याची माहिती आहे. या प्रक्रियेसाठी लवादाने 5 मे पर्यंत मुदतही दिली आहे.

याआधी कारखान्याचे अध्यक्ष पाटील यांनी माढा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर शिखर बँकेने कारखान्याकडे चारशे कोटींच्या थकबाकीचे कारण देत कारखान्याची तीन गोदामे सील केली होती. या गोदामांमध्ये बरीच साखर अडकून पडली होती. या कारवाईनंतर अभिजीत पाटलांनी भाजप नेत्यांच्या भेटींचा सिलसिला सुरू केला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. यानंतर चक्र फिरली आणि अभिजीत पाटील यांनीही आपला निर्णय फिरवला.

Madha Lok Sabha : धैर्यशील मोहितेंना माढा अवघडच, कारणेही अनेक; निंबाळकरांची बाजू तगडी

दोन दिवसांपूर्वी कारखान्याचे सभासद, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेत माढ्यात महायुतीचे उमेदवार रणजित निंबाळकर यांना तर सोलापूर मतदारसंघात राम सातपुते यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच कारखान्याने बँकेच्या या कारवाईविरोधात कर्ज वसूली लवादाकडे दाद मागितली. या कारवाईतून दिलासा देण्याची मागणी करण्यात आली. यानंतर बँकेनेही कारखान्याचा हा अर्ज फेटाळण्याची मागणी केली होती.

लवादाने दोन्ही बाजू्ंचे म्हणणे ऐकून घेतले. हा वाद न्यायालयात असल्याने कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार नाही, असे बँकेच्या वकिलांनी सांगितले होते. तरीदेखील कारखान्याची गोदामे सील केली. ही कारवाई अयोग्य असल्याचे स्पष्ट करत या गोदामांचा ताबा पुन्हा कारखान्याकडे देण्यात यावा असे आदेश कर्ज वसूली लवादाने दिले आहेत.

दरम्यान, अभिजीत पाटील यांनी पाठिंबा जाहीर केल्याने दोन्ही मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवारांचे बळ वाढणार आहे. माझी महत्वाकांक्षा बाजूला ठेऊन कारखाना टिकला पाहिजे. सोलापुरात ऊस दरासाठीची स्पर्धा अशीच पुढे सुरू राहिली पाहिजे. याद्वारे शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळाला पाहिजे यासाठी आपण ही राजकीय भूमिका घेतली असल्याचे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube