सोलापूर : महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) 20 ते 22 आमदार संपर्कात असल्याचा मोठा दावा उद्योगमंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी केलाय. ते माढा (Madha) तालुक्यातील टेंभूर्णीत आयोजित कुस्ती स्पर्धेच्या कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी ते बोलत होते. राजकारण्यांनी देखील कुस्तीप्रमाणं खिलाडूवृत्ती शिकावी, असंही सामंत यावेळी म्हणाले.
यापुढं येणारं महापालिकेचं मैदान असो, लोकसभेचं असो अथवा विधानसभेचं सर्व कुस्त्या शिंदे-फडणवीस जिंकणार असल्याचा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केलाय.
आघाडीमधील 10 ते 12 आमदार आमदार बच्चू कडू यांच्या संपर्कात आहेत. तर 8 ते 10 आमदार माझ्या संपर्कात असल्यानं एकूण 20 ते 22 आमदार संपर्कात असल्याचा दावा उदय सामंत यांनी टेंभूर्णीत केलाय. यापुढं येणारं महापालिकेचं मैदान असो लोकसभेचं असो अथवा विधानसभेचं सर्व कुस्त्या शिंदे फडणवीस जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.
टेंभुर्णीमध्ये शिवसेना नेते संजय कोकाटे यांनी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं होतं. यावेळी सामंत यांच्यासह ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील, शिंदे गटाचे संपर्क प्रमुख शिवाजी सावंत उपस्थित होते.
Nagpur Test: सामनावीर जडेजावर ICC ची मोठी कारवाई, बोटाला मलम लावणे पडले महागात
टेंभूर्णीतील कुस्ती स्पर्धेसाठी पुणे, सातारा, कोल्हापूरसह सोलापूर जिल्ह्यातील नामांकित पैलवानांनी उपस्थिती दर्शवली. या स्पर्धा पाहण्यासाठी जवळपास 25 हजार कुस्ती शौकिनांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. मात्र सामंत यांचे भाषण सुरू होताच वीज तोडणीवर बोला असा गोंधळ प्रेक्षकांनी सुरु केला. यावेळी पुरेशा दाबानं वीज पुरवठा केला जाईल असं उदय सामंत यांनी सांगितलं.