विष्णू सानप :
सोलापूर : राष्ट्रवादीला सोडून अनेक आमदार गेले आहेत. मात्र सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि सामान्य कार्यकर्त्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. जनशक्ती शेतकरी संघटनेनंही सोलापूरमधून मोठी शक्ती शरद पवारांच्या पाठीशी उभी करण्याचा निर्घार केला आहे, असं जनशक्ती शेतकरी संघटनेचे नेते अतुल खुपसे यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना म्हंटलं आहे. (Will Sachin Khupse contest the election from NCP against Sanjay Shinde, the current MLA of Karmala)
आज त्यांनी राष्ट्रवादीचे पुण्यातील ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांची भेट घेतली आणि चर्चा केली. उद्या ते शरद पवार यांचीही भेट घेऊन आपला पाठिंबा जाहीर करणार आहेत.
पाठिंब्याबाबत बोलताना सचिन खुपसे म्हणाले, राज्यात जी परिस्थिती सुरू आहे. त्या परिस्थितीमध्ये माजी कृषिमंत्र्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आपण संधी ओळखून शरद पवारांच्या गटात सामील होत आहात का? असे विचारले असता, ही पवारांच्या पाठीशी उभे राहण्याची वेळ आहे. ना की संधी साधण्याची. पवारांनी शेतकऱ्यांसाठी मोठं काम केलं आहे त्यामध्ये कर्जमाफी असेल शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले, असं खुपसे म्हणाले.
दरम्यान, खुपसे यांच्यारुपाने शरद पवार यांना करमाळ्याचे विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांच्याविरोधात उमेदवार मिळाला असल्याची चर्चा आहे. संजयमामा शिंदे यांनी अजित पवार यांच्यासोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. तर खुपसे यांनी 2019 मध्ये वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवत संजय शिंदे यांना आव्हान दिलं होतं. मात्र त्यांचा मोठा मताधिक्क्याने पराभव झाला होता. यावेळी बोलताना खुपसे यांनीही आमदार संजय शिंदे यांच्या विरोधात आपण ताकतीने लढणार असल्याचं जाहीर केलं आहे.
गेल्या आठवड्यात रविवारी अजित पवार पक्षातील 32 ते 35 आमदारांचा गट घेऊन भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यांच्यासह 9 आमदारांचा मंत्रिमंडळातही समावेश करण्यात आला. त्यानंतर अजित पवारांनी थेट पक्षावर दावा सांगितला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मेळावे घेतले आहेत. त्यात दोघांनी आपल्याकडे संख्याबळ असल्याचा दावा केला आहे. चाळीसपेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा अजितदादांनी केला आहे.