Download App

शहा, फडणवीस यांनी परीक्षा घेतली.. एकनाथ शिंदेंना ६० टक्के गुण पडले!

  • Written By: Last Updated:

Eknath Shinde मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृ्त्वाखालील शिवसेनेने लोकसभेसाठी आपल्या आठ जागांवरील उमेदवारांची घोषणा केली. आपल्या बंडात साथ देणाऱ्या १३ पैकी ८ खासदारांच्या जागा पुन्हा मिळविण्यात ते यशस्वी झाले. पुढच्य यादीत या जागांची संख्या आणखी वाढणार आहे. त्यामळे शिंदे यांनी टक्केवारीच्या भाषेत बोलायच तर पहिल्या फेरीत ६० टक्के यश  संपादित केले आहे. दुसऱ्या फेरीत ते डिस्टिंक्शन मध्ये पास होतील. म्हणजे ते ७५ टक्क्यांहून अधिक जागा मिळवतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपसाठी जास्तीत जास्त जागा घेण्याचा प्रयत्न करणे स्वाभाविक होते. दुसरीकडून राष्ट्रवादी काॅंग्रेससाठी अजितदादा आग्रही होते. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी यांच्या ओढाओढीत शिवसेनेच्या जागा कमी होणार, असे बोलले जात होते. पण ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे ह ग्राऊंड झिरोवर तडफेने काम करतात. तसाच आब त्यांनी इतर दोन पक्षांशी चर्चा करताना राखल्याचे दिसून येत आहेत.

भाजप इतर राज्यांत ज्या पद्धतीने मित्र पक्षांच बोळवण करतो, तशी वेळ शिंदे यांच्यावर आली नाही. हेच शिवसेनेचे नशीब. यातील बहुतांश श्रेय हे राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीला आहे. कारण भाजप स्वबळावर फार मोठी झेप राज्यात घेऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जानकरांपासून ते एकनाथ शिंदे यांना सोबत घेत, चुचकारत भाजपची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे शिंदे यांनाही न दुखवण्याचे धोरण भाजपने ठेवले. शिंदेंनीही भाजपची अडचण ओळखून आपले पत्ते व्यवस्थित पिसले. मूळच्या शिवसेनेकडे लोकसभेच्या २२ जागा होत्या. तेवढ्या आपल्याला मिळणार नाहीत, हे शिंदे यांनी ओळखले होते. एवढेच नाही तरी राष्ट्रवादी काॅंग्रेसशी युती झाल्यानंतर या जागा आणखी की होऊ शकतात, याचाही धोका त्यांना होता. भाजपकडून जास्त मागून घेण्यापेक्षा आहे  ते १३ मतदारसंघ कसे राखता येतील, यावरच त्यांनी भर दिला.

CM शिंदेंच्या शिवसेनेचे आठ उमेदवार जाहीर; खासदार तुमानेंचा पत्ता कट, कोल्हापुरात पुन्हा मंडलिकच

यात शिंदे यांनी नक्की कोणते धोके टाळले, हे आपण समजावून घेऊ या!

धनुष्यबाण चिन्ह आठ ठिकाणी राखले..

शिंदे यांच्या बहुतांश खासदारांना भाजपच्या कमळ चिन्हावरच निवडणूक लढवावी लागेल, अशी सुरवातीला हवा होती. या खासदारांनाच मोदींचे छायाचित्र आणि कमळ हवे होते, असेही सांगण्यात येत होते. पहिल्या आठ जणांच्या यादीतील सर्व उमेदवार हे शिवसेनेच्या धनुष्यबाणावरच रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे कोल्हापूर, रामटेक, हातकणंगले, शिर्डी, हिंगोली, मावळ, दक्षिण मध्य मुंबई आणि बुलडाणा या आठही मतदारसंघातील सेना कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला आहे.

फक्त एकाची उमेदवारी रद्द

जे आठ उमेदवार जाहीर झाले आहेत त्यातील फक्त रामटेकचे खासदार कृपाल तुमाणे यांचा पत्ता कट झाला आहे. या जागेवर काॅंग्रेसमधून आलेले राजू पारवे हे शिंदे यांचे उमेदवार ठरले आहेत. बहुतांश खासदारांची तिकिटे कापली जाणार, असे बोलण्यात येत होते. शिर्डीतून सदाशिवराव लोखंडे यांच नाव उमेदवारी रद्द होण्याच्या संभाव्य यादीत टाॅपवर होते. पण लोखंडे यांना पुन्हा उमेदवारी मिळवून देण्यात शिंदे यशस्वी झाले. हिंगोलीतील हेमंत पाटील यांचेही तिकिट कापण्याचा धोका होता. त्यासाठी त्यांच्याविरोधात सर्व्हे असल्याचे सांगण्यात येत होते. पण तसे घडले नाही.

भाजपकडील सक्षम पर्याय टाळले…

महाविकास आघाडीतील उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानंतर शिंदें गटात आणख अस्वस्थता वाढली होती. उदाहरणार्थ कोल्हापूरमधून काॅंग्रेसने छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी दिली. या ठिकाणी शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक पराभूत होऊ शकतात, असे सर्व्हे मग पुढे आले. त्यामुळे मंडलिक यांच्याऐवजी राजघराण्यातील असलेले भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांना उमेदवारी देण्याचा प्रस्ताव भाजपकडून आला होता. पण शिंदे यांनी तो शिताफीने टाळला. शाहू महाराज यांच्याविरुद्ध आपल्याच खासदाराला उमेदवारी देणे कसे योग्य आहे, असे त्यांनी भाजपला पटवून दिले. मावळसारख्या मतदारसंघात भाजपची ताकद जास्त होती. त्यामुळे भाजपने या ठिकाणी दावा केला होता. पण तो देखील शिंदे यांनी मान्य केला नाही. परिणामी शिंदे यांचे विश्वासू श्रीरंग बारणे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली.

राष्ट्रवादीशी उघड संघर्ष टाळला…

महायुतीत राष्ट्रवादी जागावाटपात सुरवातीपासून आक्रमक होती. अजित पवार यांनी पक्षाच्या कर्जत येथील अधिवेशनात बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड या जागांची मागणी केली होती. त्यानंतर शिवसेनेला जेवढ्या जागा मिळतील, तितक्या राष्ट्रवादीला मिळायला हव्यात, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी लावून धरली. या साऱ्या वादात शिवसेनेकडून कोणी तिखट प्रतिक्रिया दिल्या नाहीत. मुख्यमंत्री तर उघडपणे काहीच बोलले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीशी संघर्ष टाळण्यात त्यांना यश आले. नाशिकसारखी जागा मात्र शिंदे यांना छगन भुजबळ यांच्यासाठी सोडावी लागेल, असे दिसतयं. तसेच शिवसेनेतील विजय शिवतारे यांच्यासारखे नेते हे अजित पवारांच्या विरोधात आक्रमक झाले होते. याचा महायुतीवर मोठा परिणाम होण्याची चिन्हे होती. पण शिवसेना अशक्त नाही, असाही संदेश शिवतारे यांच्या बंडाच्या भाषेतून गेला. त्याचा शिंदे यांन अप्रत्यक्ष फायदा झाला. त्यामुळे राष्ट्रवादीनेही सेनेशी पंगा घेण्याच टाळले. नंतर शिवतारे यांना आवरण्याचे कसब शिंदे यांनी दाखवले. परिणामी शिवतारे यांचे संभाव्य बंड हवेतच विरले.

मनसेच्या प्रस्तावावर तर चुप्पी

शिंदे यांच्यासाठी सर्वात जास्त धोकादायक प्रस्ताव होता तो राज ठाकरे यांना शिवसेनेचे अध्यक्ष करण्याचा. हा प्रस्ताव भाजपने त्यांच्यापुढे ठेवल्याची चर्चा होती. तसे होणे म्हणजे खुद्द शिंदे यांच्या नेतृत्वाला ब्रेक लागणे असे होते. पण शिंदे यांच्याकडून यावर कोणतीच प्रतिक्रिया आली नाही. मनसेशी झालेल्या वाटाघाट अजूनही गुलदस्त्यत आहेत. भाजप कोणत्या स्तरावर जाऊन शिंदे यांना अडचणीत आणेल, याची ही चुणूक होती.

 पुढील सहा महिने तरी नेतृत्व अबाधित

एकनाथ शिंदे समर्थक खासदारांची तिकिटे मोठ्या प्रमाणात कापली गेली असती तर शिंदेंच्या आमदारांत अस्वस्थता निर्माण झाली असती. लोकसभा निवडणुकीचा निकाल काहीही लागला असता तर या हे आमदार इतर पर्याय शोधण्याच्या मागे लागले असते. त्यामुळे शिंदे यांची ताकद कमी झाली असती. विधानसभा निवडणुकीत शिंदे हे आपल्याला उमेदवारी मिळवून देऊ शकतात, हा संदेश आमदारांत गेला आहे. त्यामुळे शिंदे यांचे नेतृत्वही तोपर्यंत अबाधित राहणार आहे.

 

follow us