दिवाळी सणाच्या फटाक्यांचा फटका शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांनाही बसल्याची घटना घडली आहे. ते राहत असलेल्या इमारतीला आग लागल्याची घटना घडली. ही आग दिवाळीच्या रॉकेटमुळे लागली. (Mumbai) इमारतीच्या 22 व्या मजल्यावर आग लागल्याची माहिती मिळताच रवींद्र वायकर स्वतः त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी आग विझवली. त्यावेळी इमारतीच्या फायर सिस्टिमध्ये पाणी येत नसल्याचं समोर येताच रवींद्र वायकर चांगलेच भडकल्याचं दिसून आलं.
खासदार रवींद्र वायकर हे राहत असलेल्या इमारतीच्या 22 व्या मजल्यावर दिवाळीच्या रॉकेटमुळे आग लागली. रवींद्र वायकर स्वतः ती आग विझवण्यासाठी आले. मात्र फायर सिस्टीममध्ये पाणीच नसल्याने त्यांचा संताप झाला. नवीन इमारतीमध्ये फायर सिस्टिमची अशी परिस्थिती असेल तर इतर इमारतींचे काय असा प्रश्न यावेळी रवींद्र वायकरांनी विचारला. मुंबईतील प्रत्येक इमारतीमध्ये मुंबई महानगरपालिका आणि फायर ब्रिगेडने फायर सिस्टम सर्व्हिस केली आहे का याची तपासणी केली पाहिजे अशीही मागणी वायकरांनी केली.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुण्यात फटाक्यांची आग; शहरातील अनेक ठिकाणी आग लागल्याच्या घटना
यंदाच्या दिवाळीत रॉकेटमुळे मुंबई शहरात मोठ्या संख्येमध्ये इमारतीमध्ये आग लागल्याच्या घटना समोर आल्या. त्यामुळे घातक फटाक्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी लोकसभेत आवाज उठवणार असल्याची माहिती शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांनी दिली. रॉकेट बॉम्ब इमारतीचा आजूबाजूला लावू नका, त्यामुळे आगीच्या घटना घडू शकतील. दिवाळी ही सुरक्षितपणे साजरी करा असे आवाहनही त्यांनी सर्व मुंबईकरांना केले.
खासदार रवींद्र वायकर यांनी दिल्लीमध्ये त्यांच्या निवासस्थानी दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यामध्ये त्यांनी मराठी संस्कृती आणि मराठी पदार्थांची मेजवानी दिल्लीतील मराठी लोकांना दिली. मुंबई आणि महाराष्ट्रात ज्या पद्धतीने आपण दिवाळी साजरी करतो त्याच पद्धतीने दिल्लीला दिवाळी साजरी झाली पाहिजे अशी संकल्पना माझ्या मनात होती. त्यामुळे मी दिल्लीत पहिल्यांदा दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केलं. या कार्यक्रमांमध्ये मुंबईचा सुप्रसिद्ध वडापाव आणि मिसळ अशा पदार्थांचे दीडशे लोकांसाठी आयोजन केलं.