Download App

मंत्र्यांना ‘एका’ बंगल्याची धास्ती, केसरकरांचं मंत्रिपद हुकल्याने चर्चाही वेगळ्याच!

माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनाच मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं आहे. यंदा त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नाही.

Maharashtra Cabinet Expansion : महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपूरमध्ये पार पडला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या अकरा आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. जुने आणि नवे असं कॉम्बिनेशन यात दिसलं. पण दिसला नाही एक चेहरा जो मागील अडीच वर्षांच्या काळात सतत माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर असायचा. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर. कोणतीही घटना असो राजकीय घडामोडी असोत माध्यमांना प्रतिक्रिया द्यायचे. सरकारची बाजू सावरायचे. पण त्यांनाच मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं.

आता त्यांना मंत्रिपद नाकारण्यामागे अनेक कारणे असतीलही. पण एक चर्चा अशी सुरू झाली आहे जी ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. दीपक केसरकर राहत असलेल्या रामटेक या शासकीय बंगल्यावरून चर्चा सुरू झाल्या आहेत. यामागे नेमकं काय गौडबंगाल आहे? बंगल्यामुळं खरंच केसरकरांचं मंत्रिपद हुकलं का? याचं उत्तर मिळवू या..

मंत्रिमंडळ विस्तारात नगरकरांच्या पदरी निराशा! जिल्ह्यात फक्त विखेच एकमेव मंत्री

मुंबईतील मलबार हिल परिसरातील देखणा असा रामटेक बंगला. हा बंगला आपल्यालाच मिळावा यासाठी राजकीय मंडळी स्पर्धा करायची. कारण हा बंगला अतिशय मोठा आणि तितकाच प्रशस्त आहे. या बंगल्याचा राजकीय इतिहास मात्र उलथापालथीचा राहिला आहे. मंत्र्यांना राहण्यासाठी हा बंगला नक्कीच आरामदायक आहे. पण, या बंगल्यात राहणाऱ्या मंत्र्यांच्या राजकीय कारकिर्दीत कधी कोणती वळणे येतील याचा काहीच अंदाज नसतो. आता या राजकीय वळणाचं उदाहरण म्हणून दीपक केसरकरांकडे पाहता येईल.

या बंगल्याबाबत सध्या ज्या चर्चा सुरू झाल्या आहेत त्या समजून घ्यायच्या असतील तर थोडं इतिहासात डोकवावं लागेल. सन १९९५ मध्ये जेव्हा राज्यात युतीचं सरकार आलं तेव्हा स्व. गोपीनाथ मुंडे रामटेक बंगल्यात होते. पुढे १९९९ मध्ये युतीचं सरकार गेलं होतं. यानंतर आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना तेलगी प्रकरणात राजीनामा द्यावा लागला होता. आघाडीनंतर युती सरकारच्या काळात हाच बंगला ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना मिळाला होता. पण भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून दीड वर्षातच खडसेंना मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

पुढे २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात छगन भुजबळ पुन्हा रामटेक बंगल्यात आले. पण कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच २०२२ मध्ये महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. राज्यात युतीचं सरकार आलं. या सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. दीपक केसरकरांना शिक्षण खात्याचं मंत्रिपद मिळालं. त्याचबरोबर त्यांना रामटेक बंगला राहण्यासाठी मिळाला. येथेच केसरकरांचा मुक्काम होता.

चव्हाण, भुजबळांचा पत्ता कट; फडणवीसांच्या मंत्रिमंडळ विस्तारात दडलेले 6 संदेश

सरकारचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. महायुतीचं बहुमताचं सरकार आलं. सर्वत्र फीलगुड वातावरण असताना दीपक केसरकरांच्या बाबतीत मिठाचा खडा पडला. मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना डावलण्यात आलं. त्यामुळे रामटेक बंगल्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. याच बंगल्यात वास्तव्यास असल्याने तर केसरकरांचं मंत्रिपद गेलं नाही ना, असा सवाल राजकीय वर्तुळातून ऐकू येत आहे.

राजकारणातील या घडामोडी पाहिल्या तर रामटेक बंगला नकोच अशी मानसिकता राजकीय नेत्यांची झाल्याचे दिसून येत आहे. स्व. विलाराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, शरद पवार असे मातब्बर नेते या बंगल्यावर काही काळ वास्तव्यास होते. पण आता याच बंगल्यामुळे राजकीय नेत्यांमागे अडचणींचं शुक्लकाष्ठ लागल्याचंही दिसून येत आहे.

follow us