मुंबई : “कंत्राट काढून 10 महिने झाले, मग आज का मोर्चा काढला जातो ? सेटलमेंट होत नाही म्हणून मोर्चा काढला जातो का? असा तिखट सवाल करत मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना विचारला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (MNS) मुंबईत आज (18 डिसेंबर) आढावा बैठक पार पडली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. (MNS chief Raj Thackeray questioned Shiv Sena chief Uddhav Thackeray on the anti-Adani march.)
धारावी पुनर्विकास प्रकल्प उद्योगपती गौतम अदानी यांना दिल्याच्या विरोधात नुकताच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर बोलताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.
राज ठाकरे म्हणाले, मुळात हा प्रकल्प परस्पर अदानींना का दिला? अदानींकडे असे काय आहे? विमानतळही तेच हाताळू शकता, कोळसा पण तेच हाताळू शकतात आणि आता हा प्रकल्पही तेच हाताळू शकतात? टाटांपासून इतरही लोक उद्योगात आहेत. त्यांच्याकडून डिझाईन मागवू शकत होते. टेंडर मागवू शकत होते. पण तसे झाले नाही.
तिथल्या पदाधिकाऱ्यांशी माझे बोलणे झाले, अदानी ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांशीही बोलणं झाले, म्हटलं की तुमच्याकडचं डिझाईन दाखवा. पण मूळ मुद्दा असा आहे की, आता हा मोर्चा का काढला जात आहे? कंत्राट काढून 10 महिने झाले, मग आज का मोर्चा काढला जातो ? सेटलमेंट होत नाही म्हणून मोर्चा काढला जातो का?
तिथे नेमका कसा प्रकल्प उभा राहणार आहे? रस्ते कसे असणार आहेत? शाळा कशा असणार आहेत? इमारती किती असणार आहेत? इमारतीत राहणारे लोक किती असणार आहेत? काही तरी टाऊन प्लॅनिंग नावाची गोष्ट हवी असते की नको? की घेतली एखादी जागा आणि दिली अदानींना, असे होत नाही.
हे आता आठ ते 10 महिन्यांनंतर इंडिया आघाडी जागी झाली आहे, मोर्चा काढत आहेत, पण यांनी विचारले का तिकडे काय होणार आहे? की मोर्चाचा दबाव आणून केवळ सेटलमेंट करायची? असा सवालही राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना केला.