Sudhir Mungantiwar : आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर (Elections 2024) ठेवत महायुतीच्या सरकारने मोठा डाव टाकला. राज्यातील महिलांसाठी माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली. या योजनेची कार्यवाही सुरू झाली असून राज्यातील जवळपास अडीच कोटी महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहे. या योजनेचा राज्य सरकारकडून त्यातही शिंदे गटाकडून मोठा गाजावाजा केला जात आहे. परंतु, सरकारच्याच अर्थ विभागाकडून या योजनेला विरोध होत असल्याचे समोर आले आहे. अर्थखात्याने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेला तीव्र विरोध केल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकारण ढवळून निघालं आहे. विरोधक तर टीका करतच आहेत पण आता खुद्द मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनीच अर्थखात्याचे कान टोचले आहेत.
मुनगंटीवार म्हणाले, लाडकी बहीण योजनेवर अर्थविभागाने चिंता व्यक्त करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. कारण मंत्रिमंडळाच्या कोणत्याही निर्णयाची फाईल वित्त विभागाकडूनच जाते. वित्त विभागाला यावर आक्षेप घेण्याचा अधिकार यासाठी नाही कारण ज्यावेळी आपण वेतन आयोग देतो त्यावेळी 44 हजार कोटींचा भार आपण आपल्या कर्मचाऱ्यांसाठी देतो. दिलाच पाहिजे. 17 ते 18 लाख कर्मचाऱ्यांसाठी 44 हजार कोटींचा भार दिल्यावरही आपली वित्त व्यवस्था अडचणीत येत नाही. पण 2 कोटी 48 लाख बहिणींना तेवढेच जवळपास 46 हजार कोटी दिल्यानंतर वित्तीय व्यवस्था अडचणीत येते हे कोणतं अर्थशास्त्र आहे? असा सवाल मुनगंटीवार यांनी केला.
‘लाडकी बहीण’ योजनेनंतर आता ‘गुलाबी रिक्षा’ योजना; कोणत्या शहरात किती रिक्षा मिळणार?
या योजनेमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. पण राज्याच्या तिजोरीची चिंता दाखवत गरीब महिलांवर अन्याय करण्याची ज्या लोकांची इच्छा आहे तेच लोक असे बोलू शकतात. सोळा ते सतरा लाख कर्मचाऱ्यांसाठी 44 हजार कोटी रुपये दिले तेव्हा तुमच्या तोंडातून एक शब्द सुद्धा निघाला नाही पण गरीब महिलांना पैसे देण्याची वेळ आली तर तुम्हाला राज्याची तिजोरी आठवते, असा सवाल मुनगंटीवार यांनी केला.
श्याम मानव यांनी केलेल्या वक्तव्यावरही मुनगंटीवार यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, श्याम मानव यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी द्यावे. एवढ्या गंभीर विषयावर देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे. राजकारणाचा खालच्या पातळीवरची टीका बंद झाली पाहिजे. कोण म्हणतो की दंगे भडकतील. निवडणुका जिंकण्यासाठी एवढ्या खालच्या पातळीवर जायचं हे चांगल राजकारण नाही. जनतेनं सावध राहण्याची गरज आहे.
अतिवृष्टीमुळे धरणांतून विसर्ग, मात्र पाऊस अन् धरणसाठ्याचं गणित नेमकं काय? जाणून घ्या सविस्तर