मुंबई : अखेर वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत प्रवेश झाला आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज (2 फेब्रुवारी) महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) बैठकीत भाग घेतला. त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), गटनेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेना (UBT) नेते संजय राऊत अशा सर्व नेत्यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी आंबेडकर यांना काँग्रेसची वंचित बहुजन आघाडीबाबतची भूमिका समजावून सांगितली असल्याची माहिती आहे. (Vanchit Bahujan Aghadi chief Prakash Ambedkar participated in the Mahavikas Aghadi meeting)
आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाविकास आघाडीची तयारी सुरु आहे. सध्या लहान-मोठ्या पक्षांना आघाडीत सामावून घेतले जात आहे. यात मागील काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत सहभाग होण्याबाबत चर्चा सुरु होत्या. काही दिवसांपूर्वी जागा वाटपासंदर्भातील बैठकीसाठी महाविकास आघाडीच्यावतीने प्रकाश आंबेडकरांना पत्रही पाठवण्यात आले होते. या पत्रावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून उद्धव ठाकरे आणि काँग्रेसकडून नाना पटोले (Nana Patole) यांची सही होती.
मात्र नाना पटोलेंची सही पाहताच प्रकाश आंबेडकर यांनी पत्रावर आक्षेप घेतला होता. काँग्रेस पक्षाने कोणासोबत युती करावी, कोणासोबत नाही, याबाबतचे निर्णय घेण्याचा अधिकारच पटोले यांना नसल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे त्या पत्रावरुन बराच वाद झाला. त्यानंतर धुळ्यातील काँग्रेस बैठकीत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथाला यांनी हे अधिकार नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांना असल्याचे सांगितले. त्यानंतर 30 जानेवारीच्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण देण्यात आले. यात वंचितचे प्रतिनिधी सहभागीही झाले.
त्यानंतर नाना पटोले, जयंत पाटील आणि संजय राऊत यांच्या सहीनिशी वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत प्रवेश झाल्याचे पत्र दिले. पण त्यावरही आंबेडकर यांनी आक्षेप घेत पटोले यांना अधिकार नसल्याचे ते म्हणाले. वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत समाविष्ट करून घेण्याबाबचा अधिकार नाना पटोलेंना आहे की, नाही याबाबत आम्हाला शंका आहे. या पत्रावरसही करण्याचा अधिकार पटोलेंना आहे का नाही? हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने स्पष्ट करावे. तसे पत्र त्यांनी आम्हाला द्यावे. आम्हाला सांगण्यात आले आहे की, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे वंचितबाबत निर्णय घेतील.
तर जे पत्र आम्हाला दिले आहे, त्यावर पटोलेंची सही आहे. मात्र, त्यावर बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांची सही नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा अद्याप महाविकास आघाडीत समावेश झाला असल्याचे मानता येणार नाही, मात्र दोन फेब्रुवारीला होणाऱ्या बैठकीत आपण सहभागी होणार असल्याचेही आंबेडकर म्हणाले होते. त्यानंतर आज पटोले यांनी बैठकीनंतर थेट अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, संजय राऊत, जयंत पाटील अशा सर्व प्रमुख नेत्यांशी आंबेडकर यांची भेट घालून दिली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या भेटीत आंबेडकर यांची समजूत घातली असून त्यांना काही गोष्टींबाबत स्पष्टता आणून दिली. त्यानंतर आंबेडकर यांनीही महाविकास आघाडीतील प्रवेश मान्य केला असल्याची माहिती आहे.