नवी दिल्ली : भाजपने राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha) आणखी पाच नावांची एक उमेदवारी यादी जाहीर केली आहे. यात उमेदवारीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या केंद्रीय मंत्री एल. मुरुगन यांना मध्य प्रदेशातून उमेदवारी जाहीर केली आहे. तर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव ओडिशातून राज्यसभेवर जाणार आहेत. मात्र अद्यापही सात केंद्रीय मंत्री उमेदवारीच्या प्रतिक्षेत आहेत. (BJP has announced the list of five candidates for the Rajya Sabha elections)
सध्या एकूण नऊ केंद्रीय मंत्र्यांची राज्यसभेची मुदत संपत आहे. यात एल. मुरुगन, धर्मेंद्र प्रधान (मध्य प्रदेश), अश्विनी वैष्णव (ओडिसा), मनसुख मांडविया, पुरुषोत्तम रुपाला (गुजरात), राजीव चंद्रशेखर (कर्नाटक) नारायण राणे, व्ही मुरलीधरन (महाराष्ट्र), भुपेंद्र यादव (राजस्थान) यांचा समावेश आहे. यातील आता एल. मुरुगन आणि अश्विनी वैष्णव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
भाजपने जाहीर केलेल्या यादीत तीन नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे. यात मध्य प्रदेशमधून माया नरोलिया यांनाही राज्यसभेवर पाठवले जाणार आहे. याशिवाय बन्सीलाल गुर्जर आणि उमेशनाथ महाराज यांनाही मध्य प्रदेशातून राज्यसभेवर जाणार आहेत. या नेत्यांना संसदीय राजकारणाचा अनुभव नसला तरी ते दीर्घकाळापासून संघटनेत योगदान देत आहेत. यामुळे त्यांना राज्यसभेवर पाठवून त्यांचा सन्मान करण्यात आल्याचे मानले जात आहे.
महिला चेहरा असलेल्या माया नरोलिया या राज्याच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा आहेत. याशिवाय त्या जाट समजातून येतात. त्या मध्य प्रदेशातील होशंगाबाद नगरपालिकेच्या अध्यक्षाही होत्या. बन्सीलाल गुर्जर हे भाजपच्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. ते प्रदीर्घ काळापासून संघटनेत काम करत आहेत. याशिवाय उमेशनाथ महाराज हे संत असून मध्य प्रदेशात त्यांचे अनुयायी मोठ्या संख्येने आहेत.