FASTag News : मोदी सरकार FASTag फक्त टोल भरण्यापुरतेच मर्यादीत ठेऊ इच्छित नाही. याच फास्टॅगचा उपयोग वाहने चार्ज करण्यासाठी, पार्किंग शुल्क देण्यासाठी, वाहनांचा विमा हप्ता भरण्यासाठी कसा करता येईल याचा आढावा रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज मिनिस्ट्री घेत आहे. लोकांच्या अडचणी कमी करण्याच्या उद्देशाने फास्टॅग अधिक स्मार्ट करण्यावर भर दिला जात आहे.
याच दिशेने बुधवारी एक मोठं पाऊल उचलण्यात आलं. भारतीय राजमार्ग प्रबंधन कंपनीने (IHMCL) देशातील फिनटेक कंपन्यांची कार्यशाळा घेतली. FASTag सिस्टीमसाठी नवनवीन आयडीया शोधणे हा या कार्यशाळेचा उद्देश होता. मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की फिनटेक कंपन्यांचं नेमकं काय मत आहे हे जाणून घेणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. फास्टॅगला (FASTag News) टोलव्यतिरिक्त आणखी कोणत्या कारणांसाठी वापरता येईल, नियमांचे पालन कसे सुनिश्चित होईल, तक्रारींचे निवारण कसे करता येईल, सुरक्षितता कशी राहिल या महत्वाच्या मुद्द्यांवर कार्यशाळेत चर्चा झाली.
इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार या कार्यशाळेत मल्टी लेन फ्री फ्लो टोलिंग प्रणालीवर चर्चा झाली. ही अशी प्रणाली आहे ज्यामध्ये टोलनाक्यावर वाहनांना रोखणारी बॅरियर राहणार नाहीत. गाडी न थांबताच निघून जाईल आणि त्या गाडीचा FASTag किंवा नंबर प्लेट वाचून टोल वसूल केला जाईल. फिनटेक कंपन्यांनी या टेक्निकच्या विकासात योगदान द्यावे अशी मंत्रालयाची इच्छा आहे.
मोठी बातमी! उद्यापासून फास्टॅगच्या नियमांमध्ये होणार बदल, आजच पूर्ण करा ‘ही’ प्रक्रिया नाहीतर
नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन (NETC) FASTag देशभरातील 1728 टोलनाक्यांवर (1113 नॅशनल हायवे आणि 615 स्टेट हायवे) लागू आहे. देशातील एकूण 98.5 टक्के टोल वसूली फास्टॅगच्या माध्यमातून केली जाते. जवळपास 38 बँकांनी मिळून 11 कोटी 4 लाखांपेक्षाही जास्त FASTag जारी केले आहेत. या माध्यमातून अत्यंत वेगाने कामकाज केले जात आहे.
दरम्यान, याबाबतीत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी भाष्य केले आहे. FASTag सिस्टिममध्ये टोल भरण्याव्यतिरिक्त आणखी शक्यता आहेत. फास्टॅग देशभरात डिजिटल प्रवास अधिक व्यापक करू शततो. फिनटेक कंपन्या आणि अन्य यंत्रणांना सोबत घेत आम्ही FASTag ला एक मजबूत प्लॅटफॉर्म बनवू इच्छित आहोत. यामुळे लोकांना चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, वाहतूक सेवा विनाअडथळा सुरू राहतील.
NHAI वर दुचाकी वाहनांनाही द्यावा लागणार टोल?; गडकरींनी दिलं स्पष्टीकरण