छिंदवाडा : माजी उपजिल्हाधिकारी निशा बांगरे (Nisha Bangre) यांना तिकीट देणार नसल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. मध्य प्रदेश (Madhya Pradesh) काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांच्या उपस्थितीतमध्ये बांगरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र त्या निवडणूक लढवणार नसल्याचे यावेळी कमलनाथ यांनी जाहीर केले. बांगरे यांनीही यावेळी मला पद आणि पैशाचा लोभ नाही. समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत न्याय पोहोचावा यासाठी माझा प्रयत्न आहे, असे म्हणत तिकीट न मिळाल्याबद्दल कोणतीही खंत नसल्याचे सांगितले. (Congress clarified that it will not give ticket to former Deputy Collector Nisha Bangre)
छतरपूरच्या उपजिल्हाधिकारी पदाचा राजीनामा दिल्यानंतर निशा बांगरे चर्चेत आल्या होत्या. त्यांनी राजीनामा देऊन निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, शिवराजसिंह चौहान सरकारने त्यांचा राजीनामा सरकारने स्वीकारला नाही. शिवाय त्यांच्यावर विभागीय चौकशी लावण्यात आली.निशा बांगरे यांना आमला या जागेवरून निवडणूक लढवायची होती. काँग्रेसनेही अखेरच्या यादीपर्यंत या जागेवरुन उमेदवार घोषित केला नव्हता.
बांगरे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागून राजीनामा मंजूर करण्याबाबत आदेश देण्यात यावेत अशी मागणी केली. बांगरे यांचा राजीनामा मंजूर होत नसल्याने वाट बघून अखेरीस काँग्रेसने या जागेवरुन उमेदवाराची घोषणा केली. मनोज मालवे यांना इथून उमेदवारी दिली. या जागेवर काँग्रेसने उमेदवार उभा करताच दुसऱ्याच दिवशी सरकारने निशा बांगरे यांचा राजीनामा स्वीकारला. सोबतच विभागीय चौकशीही बंद केली. यानंतर निवडणूक लढवता येऊ नये म्हणून सरकारने राजीनामा मुद्दाम स्वीकारला नाही, असा आरोप बांगरे यांनी केला.
दरम्यान, बांगरे यांचा राजीनामा मंजूर होताच काँग्रेस आमला जागेवरून उमेदवार बदलून त्यांना उभे करेल, अशी अटकळ बांधली जात होती, परंतु कमलनाथ यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला. कमलनाथ म्हणाले, तुम्ही निवडणूक लढवत नसला तरी फरक पडणार नाही. तुमची सेवा संपूर्ण मध्य प्रदेशला आवश्यक आहे. बांगरेसारख्या आणखी महिलांना आपल्याला पुढे आणायचे आहे. त्यांच्यावर अन्याय- अत्याचार करण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
तर निशा बांगरे म्हणाल्या की, मला पद आणि पैशाचा लोभ नाही. समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत न्याय पोहोचावा यासाठी माझा प्रयत्न आहे. एका बहुराष्ट्रीय कंपनीतली नोकरी मी याच कारणासाठी सोडली. त्यानंतर मी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. पण चुकीच्या राजकीय हेतूने राजीनामा थांबवला. राजकीय कारणावरून माझ्याविरोधात षडयंत्र रचले. काँग्रेस पक्ष माझ्या राजीनाम्याची वाट पाहत होता. राजीनामा स्वीकारला नाही त्यामुळे आमला विधानसभेच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली. कारण तयारीसाठी वेळ लागतो, उमेदवार जाहीर झाल्यानंतर भाजप सरकारने राजीनामा स्वीकारला, हा सरकारचा डाव होता, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.