Download App

मोठी बातमी : प्रतिक्षा संपणार, धाकधूक वाढणार; उद्या दुपारी लोकसभेच्या तारखांची घोषणा

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली :  देशात आगामी काळात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात असून, अखेर उद्या (दि.16) दुपारी तीन वाजता लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election 2024) तारखांची घोषणा केली जाणार आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. निवडणुकांच्या तारखांची घोषणा होणार असल्याने राजकीय पक्षांची आणि उमेदवारांची धाकधूक वाढणार असून, विजयासाठी आता प्रत्येक पक्षाला दिवसरात्र एक करावा लागणार आहे. आयोगाकडून लोकसभेच्या तारखांसोबत त्या किती टप्प्यात होणार याबाबत आता सर्वांना उत्सुकता लागली असून, या सर्वांचा खुलासा उद्या दुपारी केला जाणार आहे. तारखांची घोषणा होताच संपूर्ण देशात आदर्श आचारसंहिताही लागू होणार आहे. (Election Commission to announce Lok Sabha poll dates at 3 pm tomorrow)

 

लोकसभा निवडणूक 2024 चे वेळापत्रक उद्या म्हणजेच शनिवारी (16 मार्च 2024) जाहीर केले जाणार असून, निवडणूक आयोग (EC) दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा करणार आहे. पत्रकार परिषदेमध्ये आयोगाकडून लोकसभा निवडणूक आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा आणि त्या किती टप्प्यात होतील हे स्पष्ट करणार आहे. निवडणूक आयोगाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही पत्रकार परिषद थेट प्रक्षेपित केली जाणार असून, लोकसभेच्या निवडणुका एप्रिल-मे 2024 दरम्यान आठ टप्प्यांत घेतल्या जाऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

कुठे गेले युनिक नंबर्स?; इलेक्टोरल बाँड्सवरून SC ने पुन्हा SBI ला झापले; दिला सोमवारपर्यंतचा वेळ

2019 मध्ये 10 मार्च रोजी झाल्या होत्या निवडणुका जाहीर
याआधी 2019 मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा 10 मार्च 2019 रोजी जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यावेळी देशात सात टप्प्यात मतदान झाले होते. पहिल्या फेरीचे मतदान 11 एप्रिल रोजी झाले, तर सातव्या आणि शेवटच्या फेरीचे मतदान 19 मे रोजी झाले. 23 मे रोजी मतमोजणी झाली होती.

लेट्सअप विश्लेषण : गडकरी, पंकजांची उमेदवारांच्या यादीत कशी झाली एन्ट्री? ‘हे’ फॅक्टर ठरले कळीचे मुद्दे

2019 लोकसभा निवडणुकांचा काय लागला होता निकाल ?

23 मे 2019 रोजी जाहीर झालेल्या 2019 च्या निवडणुकीच्या निकालात भाजपला 303 जागा मिळाल्या होत्या. या विजयासह पक्षाने सलग दुसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन केले होते. या निवडणुकांमध्ये प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसला केवळ 52 जागांवर समाधान मानावे लागले होते. डीएमकेला 24 जागा मिळाल्या होत्या. तर, YSRCP आणि TMC या पक्षांनी प्रत्येकी 22 जागा जिंकण्यात यश मिळवले होते.

follow us