“निवडणूक आयोग म्हणजे तडजोड बहाद्दर!” पक्ष अन् चिन्हाच्या निर्णयावर ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
Aditya Thackeray on Election Commission Decision : केंद्रीय निवडणूक आयोगाने काल मोठा निकाल देत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला बहाल केलं. ऐन निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय आल्याने शरद पवार (Sharad Pawar) गटाला मोठा धक्का बसला आहे. आता शरद पवार गटाला लवकरात लवकर नवीन पक्ष चिन्ह आणि नावाची मागणी करावी लागणार आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू करण्यात आली आहे. आयोगाच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. या निर्णयावर ठाकरे गटाने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
निवडणूक आयोगाच्या या (Election Commission) निर्णयावर आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे, की इलेक्शन कमिशन खरोखर ‘स्वतंत्र’ आणि ‘निष्पक्ष’ आहे का? पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिलं की, EC म्हणजे ‘Entirely Compromised’! तडजोड बहाद्दर ! निवडणूक आयोगाने तडजोडी केल्या आहेत कारण ते तडजोड बहाद्दर आहेत.
इलेक्शन कमिशन खरोखर 'स्वतंत्र आणि निष्पक्ष' आहे का?
पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिलं की, EC म्हणजे 'Entirely Compromised'! तडजोड बहाद्दर!@PawarSpeaks@supriya_sule— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 6, 2024
काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे?
हे अदृश्य शक्तीचं यश आहे, आश्चर्यकारक निर्णय नाही. ज्या माणसाने पक्ष स्थापन केला त्याच्याकडून पक्ष काढून घेणं हे देशाच्या इतिसाहास पहिल्यांदा घडलं आहे. हे मोठं षडयंत्र आहे. शिवसेना हा मराठी माणसाचा पक्ष आहे, राष्ट्रवादी शरद पवारांचा पक्ष तोही मराठी आहे. त्यामुळे मराठी माणसाच्या विरोधात अदृश्य शक्ती जे निर्णय घेते त्याचं हे आणखी एक उदाहरण. आमदारांच्या संख्येवरुन पक्ष ठरत नाही संघटना ठरवते संघटना पवारांसोबत असून आम्ही न्यायालयात जाणार असल्याचं सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) स्पष्ट केलं होतं.
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय जाहीर केला आहे. शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिली आहे. निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला उद्या (7 फेब्रुवारी) चिन्हाबाबत माहिती देण्यास सांगितले आहे. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पक्ष आणि चिन्ह कोणाला मिळणार याची उत्सुकता सर्वाना होती. आता पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्याचे जाहीर झाले आहे. त्यामुळे शरद पवार गटाला आगामी निवडणुका वेगळ्या चिन्ह आणि नावाने लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मोठी बातमी! मुंबईत काँग्रेसला खिंडार; सिद्दीकी पिता-पुत्र अजित पवार गटात जाणार