Kunal Kamra on Mahadevi Hattin : कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील ‘माधुरी’ ऊर्फ ‘महादेवी’ हत्तीणीला गुजरातमधील वनतारा प्राणी संवर्धन केंद्रात नेण्यात आलं आहे. (Elephan) हे केंद्र रिलायन्स ग्रृपचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी हे चालवतात. महादेवी हत्तीण वनतारा मध्ये नेल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. आता महादेवीला पुन्हा नांदणीत आणण्यासाठी पुन्हा प्रयत्न केले जात आहेत.
हे सगळ सुरू असताना या प्रकरणावरुन स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने संताप व्यक्त केला आहे. कुणाल कामराने आपल्या एका शोमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कवितेतून टीका केली होती त्यामुळे तो चर्चेत आला होता. अशातच आता त्याने महादेवी हत्तीणीला परत आणण्याची मागणी करताना अंबानींवर टीका केला आहे. कुणाल कामराने याबाबत एक ट्वीट करत म्हटलं की, ‘हा देश अंबानीच्या मुलाच्या बापाचा नाही, माधुरी/महादेवी हत्तीणीला कोल्हापूरला परत पाठवा. कुणाल कामराच्या या आक्रमक भूमिकेमुळे आता वाद पेटण्याची शक्यता आहे.
‘पेटा’ या प्राणी हक्क संघटनेने नांदणी मठातील महादेवी हत्तीणीचा वन विभागाच्या परवानगीशिवाय मिरवणुकीसाठी वापर केल्याचा आरोप केला होता. यानंतर प्रकरण न्यायालयात गेलं आणि चौकशीसाठी समिती नेमण्यात आली. समितीने हत्तीणीची पाहणी करून अहवाल सादर केला, ज्यात प्राण्यांच्या हक्कांना प्राधान्य देण्याचं नमूद करण्यात आलं. मुंबई उच्च न्यायालयाने महादेवीला गुजरातमधील वनतारा येथे पाठवण्याचा आदेश दिला. नांदणी मठाने याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. परंतु, ती फेटाळण्यात आली. त्यामुळे महादेवी हत्तीण गुजरातमधील वनतारा येथे पाठवण्यात आली.
नांदणी मठ हा जैन धर्मियांचे श्रद्धास्थान आहे आणि गेल्या 33 वर्षांपासून महादेवी हत्तीण या मठाचा अविभाज्य भाग होती. कोर्टाच्या निर्णयामुळे गावकरी संतप्त झाले. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, पण तिथेही त्यांना निराशा हाती लागली. महादेवीला वनताराला पाठवण्याच्या निर्णयाने गावकऱ्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.