नवी दिल्ली : अयोध्येत राम मंदिर अस्तित्वात यावे यासाठी ज्या नेत्यांनी मोठा संघर्ष केला त्यात भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांचं नाव घ्यावंच लागेल. पण, आता या दोघांनाही धक्का देणारी बातमी आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी हे दोन्ही नेते उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे. आरोग्य आणि वयामुळे या सोहळ्यासाठी येऊ नये अशी विनंती त्यांना राम मंदिर ट्रस्टकडून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही नेत्यांनी ट्रस्टची ही विनंती स्वीकारली आहे.
Ayodhya | Champat Rai, the General Secretary of Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra says, "All preparations for the consecration ceremony will be completed by January 15, 2024. The puja for Pran Pratishtha will begin on January 16, 2024, and will continue till January 22,2024. 13… pic.twitter.com/U353PwJVfw
— ANI (@ANI) December 19, 2023
ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधत याबाबत माहिती दिली. पत्रकारांनी त्यांना अडवाणी आणि जोशी यांना का बोलावलं नाही, असा प्रश्न विचारला. त्यावर चंपत राय म्हणाले, दोघेही आता वयोवृद्ध झाले आहेत. त्यांचं वय पाहता त्यांना आम्ही या कार्यक्रमासाठी येऊ नका अशी विनंती केली. त्यांनी ही विनंती मान्य केली. अयोध्येत राम मंदिर व्हावं यासाठी लालकृष्ण अडवाणी यांनी 90 च्या दशकात रथयात्रा काढली होती. त्यांच्या या आंदोलनाचा फायदाही झाला होता. तसेच राम मंदिराच्या आंदोलनात दुसरे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांचंही मोठं योगदान राहिलं आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते कार्यक्रमाला उपस्थित राहतील अशी शक्यता होती. मात्र, आता ते या सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत हे आता स्पष्ट झालं आहे.
चंपत राय म्हणाले, 22 जानेवारी रोजीच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाची तयारी वेगात सुरू आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. तयारी 15 जानेवारीपर्यंत पूर्ण होईल आणि प्राणप्रतिष्ठेसाठी 16 जानेवारीपासून पूजा सुरू होईल. या कार्यक्रमात कोण सहभागी होणार याची माहिती देतानाच राय यांनी सांगितले की अडवाणी आणि जोशी उपस्थित राहणार नाहीत. लालकृष्ण अडवाणी 96 तर मुरली मनोहर जोशी 90 वर्षांचे होतील. तर दुसरीकडे वयोवृद्ध माजी पंतप्रधान देवेगौडा यांना आमंत्रित करण्यासाठी तीन सदस्यांची टीम तयार करण्यात आल्याचे चंपत राय म्हणाले.
जवळपास चार हजार साधू पुजारी आणि 2200 अन्य मान्यवर व्यक्तींना या सोहळ्याला निमंत्रित करण्यात आलं आहे. देशातील प्रमुख मंदिरांच्या मुख्य पुजाऱ्यांना देखील निमंत्रित केलं आहे. प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यानंतर 24 जानेवारी रोजी मंडलपूजा करण्यात येईल. तसेच 23 जानेवारीपासून मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात येणार आहे, अशी माहिती चंपत राय यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राम मंदिर म्हणजे भाजपची जहागिरी नाही; संजय राऊतांचे टीकास्त्र