सुरत : सोलंकी कुटुंबाच्या (Solanki Mass Suicide)सामुहिक आत्महत्येनंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. तब्बल सात जणांनी एकाच वेळी मृत्यूला कवटाळल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या सुरत पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. या तपासात, पोलिसांना एक सुसाईड नोटही मिळाली आहे. यात आर्थिक अडचणींमुळे आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. मृत व्यावसायिक मनीष सोलंकी यांनी काही रक्कम कर्जाऊ स्वरुपात दिली होती, मात्र ते पैसे परत न दिल्यानेच आर्थिक अडचणींचा सामना करत होते, यातून हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असे सुसाईड नोटवरुन दिसून येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Manish Solanki was facing financial problems due to non-repayment)
सुरतमध्ये (Surat) काल (28 ऑक्टोबर) सोलंकी कुटुंबातील सर्वांचे मृतदेह आढळून आले होते. यात फर्निचर व्यावसायिक मनीष सोलंकी, त्यांचे वडील कनुभाई सोलंकी, आई शिलाबेन सोलंकी, पत्नी रीटा सोलंकी आणि मुली काव्या सोलंकी, दीक्षा सोलंकी तर मुलगा कुशल सोलंकी यांचा मृत्यू झाला होता. यातील मनीष यांचा मृतदेह फासाला लटकलेला तर अन्य सहा जणांचा मृत्यू विषामुळे झाल्याचे समोर आले होते. यावरुन मनीष यांनी पत्नी, आई-वडील आणि तीन मुलांना विष दिले असावे आणि नंतर गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. या दरम्यान, पोलिसांना एक सुसाईड नोटही सापडली होती. नोटमध्ये मनीष सोलंकी यांनी आर्थिक समस्यांचा उल्लेख केला होता.
मी दिवस कसे ढकलत होतो हे माझ्या मनाला माहित आहे. मी गेल्यावर माझी मुले आणि माझे आईवडील कसे जगतील? ते माझ्याशिवाय जगू शकणार नाहीत ही चिंता मला खात आहे. हे पाऊल उचलण्यामागे कोणीतरी आहे, पण त्यांची मला नावं घ्यायची नाहीत. जर जिवंत असताना कोणाला त्रास दिला नाही, त्यामुळे मेल्यानंतरही कोणाला त्रास द्यायचा नाही. पैसे घेतल्यानंतर ते कोणीही परत करत नाही. लोक केलेले उपकार विसरतात. मी आयुष्यात अनेकांना मदत केली आहे. पण तरीही या आयुष्यात माझ्याकडून जाणूनबुजून किंवा नकळत काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा. माझ्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या लोकांना निसर्ग धडा शिकवेल, ते कधीच सुखी होणार नाहीत.